सांगली : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शक्तिपीठ महामार्गास मंजुरी देण्यात आल्यानंतर राज्यभरातील विविध जिल्ह्यात शेतकरी आणि शेतकरी नेते आक्रमक झाले आहेत. अनेक जिल्ह्यात मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना अडवले जात असून पोलिसांकडून शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं जात आहे. दुसरीकडे शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही आक्रमक पवित्रा घेत कुठल्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही, अशीच भूमिका घेतली आहे. त्यासाठी, हजारो शेतकऱ्यांना घेऊन त्यांनी रस्त्यावरील लढाई सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी देखील रस्त्यावर उतरुन शक्तिपीठ महामार्गास विरोध केला. त्यामुळे, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवत खासदार विशाल पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगली ग्रामीण पोलिसांनी खासदार विशाल पाटील यांच्यासह 50 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, या मागणीसाठी खासदार विशाल पाटील यांच्यासह शक्तिपीठ महामार्ग कृती समिती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी सांगलीतील अंकली येथे रास्ता रोको आंदोलन केलं होतं. या आंदोलनामुळे सांगली ते कोल्हापूर महामार्ग आणि रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला होता. सांगली जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी 20 जून रोजी बंदी आदेश लागू केला होता. मात्र, बंदी आदेशाचे उल्लंघन करत सांगलीचे खासदार विशाल पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्यासह शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करून तासभर वाहतूक रोखली होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवत सांगली ग्रामीण पोलिसांनी खासदार विशाल पाटील यांच्यासह 50 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दीचे आदेश असताना जमाव एकत्र करून महामार्ग रोखल्याचा ठपका ठेवत राजू शेट्टी यांच्यासह 400 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात राजू शेट्टी यांच्यासह माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार राजू बाबा आवळे, शिवसेनेचे नेते विजय देवणे यांच्यासह 400 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोल्हापूरच्या शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आंदोलनापूर्वी राजू शेट्टी यांच्या शिरोळ इथल्या घरी कोल्हापूर पोलीस पोहोचले होते. यावेळी शक्तीपीठ महामार्ग विरोधात चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना नोटीस देखील बजावण्यात आली होती. अशातच बंदीचे आदेश असतानाही जमाव एकत्र करून महामार्ग रोखल्याचा ठपका ठेवत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.