सातारा भूषण ; सद्गुणांचा महामेरू, बहुजनांचा आधारू ॥ श्रीमंतयोगी अरुणकाका॥ - जेष्ठ पत्रकार शरद महाजनी

by Team Satara Today | published on : 15 October 2025


अरुणकाका, या जगाचा निरोप घेऊन तुम्हाला अवघे काही तास लोटले आहेत.पण तुमच्या आठवणीने सद्गदित झालेले , तुमच्यावर अतोनात प्रेम करणारे मित्र, हितचिंतक, त्यांचे पाणावलेले डोळे, दाटलेला कंठ आणि ती भयाण शांतता काळीज चिरून जात आहे. तुमचा प्रसन्न, हसतमुख चेहरा, मुखातील गोड वाणी आणि हृदयातील प्रेम, आपुलकी, जिव्हाळा याची सवय झालेल्या आम्हा सर्वांना तुमचा विरह असह्य होत आहे.

तुमची माझी ओळख,मैत्री,परिचय अर्धशतकाचा.मला ते दिवस आठवतात, जेव्हा मी कोणीही नव्हतो तेव्हाचे.तुमचा परिचय झाला तो बॅडमिंग्टनमुळे.माझा मुक्काम तेव्हा शाहू स्टेडियमवर असायचा. शिवाय तुम्ही आयोजित केलेल्या संगीताच्या मैफिलींचा मी हक्काचा रसिक प्रेक्षक. नंतर आपली मैत्री सुरू झाली तेव्हा माझी पत्रकारितेतील उमेदवारी सुरू झाली होती.नागपुरातील अनुभव माझ्या पाठीशी होता.शिवाय क्रीडा क्षेत्रातील घडामोडी मी लिहीत असे.त्या माध्यमातूनच मी 'ऐक्य ' मध्ये रुजू झालो.तुमची जवळीक वाढली. विविध विषयांवरील तुमचे अभ्यासपूर्ण लेखन त्याच काळात मी अनुभवले.तुम्ही आणि दादा खूप जवळचे मित्र.'ऐक्य 'वरही तुमचे मनापासून प्रेम होते. त्यामुळे खूपदा तुमची भेट होई.नकळत तुमच्याकडून खूप गोष्टी शिकण्याची संधी मिळाली,ज्याचा फायदा मला नंतरच्या काळात झाला.

'ऐक्य'नंतर मी 'पुढारी 'परिवारात दाखल झालो.तिथेही तुमचे प्रेम , आपुलकी अनुभवता आली. साताऱ्यातील माझी तीन तपांची पत्रकारिता तुमच्याच साक्षीने बहरत गेली."अण्णा,आजची बातमी चांगली झाली आहे.तुझे लेख पण छान आहेत " अशी दाद आणि पाठीवर कौतुकाची थाप तुम्ही देत होतात.त्यामुळे माझा हुरूप वाढे; ऊर्जा,प्रेरणा मिळे.समर्थ सदन,शाहू कला मंदिर आणि क्वचितच अन्य ठिकाणी होणाऱ्या मैफिली,व्याख्याने, अन्य कार्यक्रमांचे वृत्तांकन करण्यासाठी मी आवर्जून येत असे. तुमची भेट व्हावी हा मुख्य उद्देश त्यामागे असे.मी पत्रकारितेतून निवृत्त झालो तेव्हा पत्रकार संघ आणि काही संस्थांनी पाठक हॉलमध्ये आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात तुम्हीच प्रमुख पाहुणे होतात. तुमच्या हस्ते झालेला सत्कार कोणत्याही पुरस्कारापेक्षा लाख मोलाचा होता.

त्यानंतरही तुमच्या भेटी होत राहिल्या. 'काही लिहितोस का ?' अशी विचारणा करत तू आणि सुरेश महाजनी यांनी सातारा क्रिकेटचा इतिहास लिहा असा आग्रह केला होता. तुमच्या हयातीत ते स्वप्न आम्ही पूर्ण करू शकलो नाही याची सल मनात कायम राहील.तुम्ही माझ्यासह सर्वच पत्रकारांचे लाडके होतात.तुमचे मार्गदर्शन, मोलाचा सल्ला नेहमीच हवाहवासा वाटे. सातारची पत्रकारिता आणि तुम्ही असे समीकरण नकळत तयार झाले होते.विविध विषयांवरील तुमचे अभ्यासपूर्ण लेखन, समीक्षण,निवडणुकी वेळी केलेले अचूक निरीक्षण मनाला खूप भावत असे.या क्षेत्रातही तुम्ही दीपस्तंभ होतात.

 'सातारा भूषण ' ही संकल्पना तुमचीच. सातारच्या सुपुत्रांनी विविध क्षेत्रात घेतलेली भरारी लक्षात घेऊन त्यांना 'सातारा भूषण ' पुरस्काराने सन्मानित करावे हा संकल्प तुम्ही रा. ना.गोडबोले ट्रस्ट आणि सातारकर नागरिकांच्या वतीने सोडलात, तो सिद्धीस नेलात, ही केवढी मोलाची कामगिरी. अरुण काका,खऱ्या अर्थाने तुम्हीच 'सातारा भूषण ' आहात अशी भावना सर्वांच्या मनात आहे.फक्त हा मानाचा पुरस्कार तुम्हाला प्रदान करण्याचे भाग्य आमच्या नशिबी नाही ही खंत आहे.

अरूणकाका, तुमच्या देदीप्यमान कारकिर्दीचा, बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा मागोवा घेण्याची ताकद आज माझ्या शब्दात नाही,ते शब्द जड झाले आहेत. तुम्ही या जगात नाही ही कल्पनाही करवत नाही. गेल्या वर्षी शाहू कला मंदिरात तुमच्या सहस्रचंद्र सोहळ्यात झालेली तुमची भेट अखेरची ठरली.त्यानंतर माझे पुण्याहून सातारला  फारसे येणे झाले नाही. डॉ.अच्युत आणि काही मित्रांकडून तुमच्या प्रकृतीची विचारपूस करत होतो.शिवाय अखेरच्या क्षणापर्यंत तुम्हाला फेस बुकवर पाहात होतो. जुन्या मित्रांच्या आठवणी,आयुष्यातील काही प्रसंग,आठवणी वाचत होतो.तुमचे समाजभान अनुभवत होतो.पण तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा मनात असूनही मी भेटलो नाही.कारण नेहमी प्रसन्न,हसतमुख चेहऱ्याने समोर येणारा,माझे हात हातात घेऊन 'काय अण्णा ,कसा आहेस ?' अशी प्रेमाने विचारपूस करणारा लाडका अरूणकाका मला कुठे दिसत नव्हता.तुला तशा गलितगात्र,थकलेल्या अवस्थेत पाहण्याची, भेटण्याची माझ्या मनाची तयारी होत नव्हती.त्याबद्दल तू मोठ्या मनाने माफ करशील ना...?

 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुलीच्या जन्माचे स्वागत हीच सामाजिक समता: विस्तार अधिकारी, प्रसिद्ध वक्ते यशेंद्र क्षीरसागर

संबंधित बातम्या