वाई : वाई पालिकेच्या सुलतानपूर येथील कचरा डेपोला मध्यरात्री मोठी आग लागली. यामुळे कचरा डेपोलगत असलेल्या औद्योगिक वसाहत सुलतानपूर परिसरात सर्वत्र धूर पसरला होता. आगीचे मोठे लोळ दूरवरून दिसत होते. ही आग आटोक्यात आणण्यासाठी पालिकेचे सर्व बंब घटनास्थळी दाखल झाले. दुपारपर्यंत ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. या आगीत मोठया प्रमाणात कचरा जळून खाक झाला. ही आग नेमकी कशामुळे लागली, हे समजू शकले नाही.
वाई पालिकेचा सुलतानपूर येथे कचरा डेपो आहे. शहरातील व आजूबाजूच्या ग्रामपंचायती आणि औद्योगिक वसाहतींतील कचरा येथे टाकण्यात येतो. या कचरा डेपोला मध्यरात्री मोठी आग लागली. ही आग एवढी भयानक होती, की त्यामुळे परिसरातील औद्योगिक वसाहत, सुलतानपूर ग्रामपंचायत आणि लगतच्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. सर्व परिसरात धूर पसरला होता. धुराचे लोट हवेत दूरवरून दिसत होते. ही आग आटोक्यात आणण्यासाठी वाई, सातारा, पाचगणी, महाबळेश्वर, कराड, किसनवीर कारखाना येथील बंब अविरत काम करत होते. मात्र, आग आटोक्यात येत नव्हती. सकाळी सात वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, दुपारपर्यंत ती धुमसत होती. दुपारपर्यंत धूर निघत होता. धूर दिसणार्या जागेवर पाण्याची फवारणी करण्याचे काम सुरू होते. या घटनेनंतर मुख्याधिकारी संजीवनी दळवी, आरोग्य अधिकारी विजय मारोडा व कर्मचार्यांनी पाहणी केली. दरम्यान, ही आग लागली की अज्ञाताकडून लावण्यात आली याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती.