सातारा : सोनगाव ग्रामस्थांनी पंधरा दिवस धुराचा त्रास सहन केल्यानंतर सोमवारी आक्रमक होत सोनगाव डेपोकडे जाणाऱ्या सातारा पालिकेच्या घंटागाड्या रोखल्या. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांनी धुराचा पूर्ण बंदोबस्त होईपर्यंत डेपोकडे गाड्या न पाठवण्याचा आक्रमक पवित्रा घेतला.
आंदोलनाच्या दरम्यान नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष एड. दत्ता बनकर, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, मुख्याधिकारी विनोद जळक यांनी ग्रामस्थांची समजूत काढत धुराचा बंदोबस्त करण्याची ग्वाही दिली. सकाळी साडेआठ वाजता सोनगाव कचरा डेपोपासून शंभर मीटर अंतरावर ग्रामस्थांनी रस्त्यावरच ठिय्या मारून घंटागाड्या रोखत पत्रा संकलन बंद पाडले. धुराचा बंदोबस्त करा अन्यथा कचरा टाकू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेत घंटागाडी चालकांना इशारा दिला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे सोनगाव शेंद्रे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती.
आंदोलनाचे वृत्त कळताच नगराध्यक्ष अमोल मोहिते,उ पनगराध्यक्ष एड. दत्ता बनकर,आरोग्य सभापती धनंजय जांभळे तसेच पालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सोनगाव ग्रामस्थांनी आपली भूमिका आक्रमकपणे मांडत डेपोवर कचरा टाकण्यात येऊ नये,अशी जोरदार मागणी केली. अमोल मोहिते व दत्ता बनकर यांनी ग्रामस्थांची समजूत घातली. धुराचा कायमस्वरूपी बंदोबस्त करून त्याचा सोनगाव ग्रामस्थांना त्रास होणार नाही असे आश्वासन देण्यात आले. सोनगाव कचरा डेपोवर सीसीटीव्ही येथील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे, कचरा डेपोतील दूषित पाणी गटाराद्वारे ओढ्यात सोडणे, धुराचा बंदोबस्त होईपर्यंत डेपोमध्ये कचरा टाकण्यात येऊ नये, अशा मागण्या ग्रामस्थांनी केलेल्या आहेत. या सर्व प्रश्नांवर योग्य तो मार्ग काढला जाईल असे आश्वासन नगरपालिकेच्या वतीने देण्यात आले आहे.