सातारा : मालवण येथील राजकोट किल्ल्यावर शिव पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. या प्रकरणासह कलकत्ता येथील डॉक्टर महिलेवर नराधमांकडून अत्याचार झाला. या दोन्ही घटनांचा सातारा जिल्हा महिला संघटनेच्या वतीने सातार्यात फेरी काढून निषेध करण्यात आला.
यावेळी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. एडव्होकेट वर्षा देशपांडे व एडव्होकेट शैला जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुमारे शेकडो महिला या फेरीमध्ये सहभागी झाल्या. यावेळी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात नमूद आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावर शिव पुतळा कोसळला ही घटना खेदजनक आहे. त्यामुळे राज्यातील जनता नाराज आहे. राज्यात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणास जबाबदार असणारे सर्व घटक मग त्यामध्ये शासनाचे कोणी मंत्री असो किंवा उच्च पदाधिकारी अशा सर्वांची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय पश्चिम बंगालमधील कोलकत्ता, उत्तराखंड मधील रुद्रपुर व महाराष्ट्र राज्यातील बदलापूर, अकोला जिल्ह्यातील महिला अत्याचाराच्या अमानवीय घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेच्या गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने संबंधित गुन्हेगारांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ही निषेध रॅली येथील मुक्तांगण कार्यालय, पोलीस मुख्यालय ते पोवई नाका व तेथून जिल्हाधिकारी कार्यालय अशी काढण्यात आली. यावेळी जिल्हा प्रशासनाचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले.
सातारा जिल्हा महिला संघटनेची निषेध फेरी
मालवण शिव पुतळा दुर्घटना व कलकत्ता महिला अत्याचार प्रकरणाचा केला निषेध
by Team Satara Today | published on : 02 September 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा