‘गुलाबी’ चित्रपटातील ‘सफर’ हे प्रेरणादायी गाणे नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी आणि श्रृती मराठे यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले हे गाणे संगीतप्रेमींच्या प्रचंड पसंतीस येत आहे. अदिती द्रविड हिने शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला साई – पियुष यांचे संगीत लाभले आहे. तर आयुष्याची सफर घडवणारे हे गाणे राहुल देशपांडे यांनी गायले आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. चाहत्यांना हे गाणं आवडत आहे.
या नुकत्याच रिलीज झालेल्या गाण्यातून हरवलेल्या मैत्रिणी स्वत्वाचा शोध घेताना दिसत आहेत. आयुष्यातील त्यांची ही सफर त्यांना हरवलेले अस्तित्व शोधण्यात मदत करताना दिसत असून मैत्रीच्या नात्याचा एक सुंदर प्रवास यातून उलगडत आहे. गाण्याच्या सादरीकरणासह जयपूरची रंगीबेरंगी सफरही घडताना दिसून येत आहे. मैत्रीचा प्रवास या विषयावर आधारित या गाण्याची संकल्पना चाहत्यांना प्रचंड आवडली आहे. हे गाणं पाहताना प्रेक्षक या गाण्याला एन्जॉय करत आहेत.
गाण्याबद्दल दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर म्हणतात, ‘कधी कधी आयुष्यातील एखादी सफर खूप काही मौल्यवान ठेवा देऊन जाते. या गाण्यातील ही सफर अशीच आहे. तीन वेगळ्या विचारांच्या, व्यक्तिमत्वाच्या व्यक्ती एकत्र येऊन त्यांचे आयुष्य सुंदररित्या जगत आहेत. हे एक प्रेरणादायी गाणे असून मैत्रीची एक सुंदर सुरुवात यात दिसत आहे. हे गाणे ऐकून अनेक मैत्रिणी अशी सफर करण्यास निश्चितच तयार होतील’ असे त्यांचे म्हणणे आहे.
व्हायोलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘गुलाबी’ चित्रपटाच्या सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे निर्माते आहेत. तर अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित या चित्रपटात अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी आणि श्रृती मराठे यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट येत्या २२ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्याचा अनुभव चाहत्यांना लवकरच घेता येणार आहे.