सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत उपनगरांचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देऊन शाहूनगर ची वाढीव पाणीपुरवठा योजना एप्रिल पर्यंत पूर्ण केली जाईल, असे आश्वासन दिले. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास पुन्हा एकदा उपनगरातल्या नागरिकांनी आणि नगरसेवकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी मंगळवारी बोलावलेली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची बैठक तांत्रिक कारणास्तव रद्द करण्यात आली होती .मात्र बुधवारी पाणीपुरवठा योजनेची गांभीर्य लक्षात घेऊन अमोल मोहिते यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांच्याशी संपर्क करून तात्काळ बैठकीचे निर्देश दिले .त्यानुसार येथील छत्रपती शिवाजी सभागृहामध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला मुख्याधिकारी अभिजीत बापट नगरसेवक अविनाश कदम फिरोज पठाण राजू गोरे प्राधिकरणाचे उपअभियंता महादेव जंगम विजय देशमुख एल एम गडकरी इत्यादी उपस्थित होते .
दरे पाणीपुरवठा योजनेतील त्रुटी दूर करून पालिका व प्राधिकरणाकडून या योजनेची पाहणी करणे आणि नंतर हस्तांतरणाचा निर्णय घेणे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला .अजित वाघमारे यांनी शाहूनगर सदर बाजार गोडोली रामराव पवार नगर जगतापवाडी तसेच शहराच्या पश्चिम भागातील मोरे कॉलनी या भागांना सादर करावयाच्या पाणीपुरवठा वेळांचे वेळापत्रक सादर केले. प्राधिकरणाच्या वतीने जलवाहिन्यांची लिकेजेस काढण्याची कामे या आठवड्यात पूर्ण केली जातील त्यासाठी संबंधित ठेकेदारांना तात्काळ सूचना देण्यात आले आहेत असे ते म्हणाले .शाहूनगर परिसरासाठी टप्पा एक ची 33 कोटी रुपयांची सुधारित पाणीपुरवठा योजना आहे दुसऱ्या टप्प्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत याबाबत लवकरच योग्य ते नियोजन केले जाईल असे ते म्हणाले .पाणीपुरवठा ज्यावेळी बंद असेल त्यावेळी प्राधिकरणाकडून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल जलवाहिन्यांची कामे करण्यासाठी रस्ते खोदल्या गेल्यास त्याच्या दुरुस्तीचे पैसे प्राधिकरण नगरपालिकेकडे जमा करेल असे आश्वासन वाघमारे यांनी दिले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या बैठकीत शाहूनगर गोडोली विलासपूर सदरबाजार, दौलतनगर ,करंजे, पिलेश्वरीनगर तामजाईनगर, शाहूपुरी या भागातून आलेला नगरसेवकांनी बरेच मुद्दे उपस्थित केले होते. मात्र बुधवारी प्राधिकरणाची अचानक बैठक बोलवण्यात आली, त्यामध्ये बहुतांश नगरसेवकांना निरोप पोहोचले नसल्याची तक्रार आहे. काही भागातील पाणी समस्येवर चर्चा झाली नसल्याने नगरसेवकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे त्यामुळे संबंधित नगरसेवक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे.