सातारा : अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्याचा फटका थेट शेतकरी वर्गातील विद्यार्थ्यांनाही बसला आहे. त्यामुळे शासनाने वैद्यकीय, अभियांत्रिकी, विधी तसेच इतर सर्व शाखांतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी पूर्णपणे माफ करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, “अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचे, घरांचे आणि मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून, अनेक पालक विद्यार्थ्यांची फी भरण्यास असमर्थ आहेत.”
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारकडे शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याची मागणी केली आहे. निवेदनकर्त्यांनी ही मागणी त्वरीत मान्य करण्याचे आवाहन केले आहे. अनेक विद्यार्थी शेतकरी कुटुंबातून येतात. पूरस्थितीमुळे शैक्षणिक फी, वसतिगृह खर्च आणि इतर शैक्षणिक गरजा पूर्ण करणे कठीण झाले आहे.
म्हणून शासनाने वैद्यकीय, अभियांत्रिकी, विधी व इतर सर्व शाखांतील विद्यार्थ्यांची फी माफ करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. cशासनाने तत्काळ निर्णय घेतला नाही, तर जनसामान्यांसाठी तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. पूरामुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या संसाराचा ताण आता त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर येऊन पडला आहे. त्यामुळे ही मागणी केवळ आर्थिक नाही, तर सामाजिक जबाबदारीची आहे, असे मत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
यावेळी राहुल पवार, भरत रावळ, प्रशांत सोडमिसे, ओंकार साळुंखे, डॉ. सौरभ चिंधे, डॉ. श्रेयश निकम, डॉ. ऋषिकेश कोळेकर, डॉ. हर्षल मराठे आदी उपस्थित होते.