सुनेत्रा पवार होणार उपमुख्यमंत्री, मुंबईत घडामोडींना वेग; शपथविधीची तयारी सुरू, शनिवारी शपथविधी

by Team Satara Today | published on : 30 January 2026





मुंबई : अजित पवार यांच्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री व्हावे, अशी मागणी केली गेली होती. त्यानुसार आता निर्णय झाला असून, शनिवारी सायंकाळी त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. अजित पवार यांच्या अपघाती मृत्युमुळे उपमुख्यमंत्री पद रिक्त झाले आहे. त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून कोणावर ही जबाबदारी सोपवली जाणार, अशी चर्चा सुरू झाली होती. 

यासंदर्भात पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. आणि त्यानंतर शुक्रवारी सायंकाळीच सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री होण्यास होकार दिला. त्यानंतर त्यांच्या शपथविधीची तयारी सुरू झाली असून, उद्या म्हणजेच ३१ जानेवारी रोजी त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. 

अजित पवारांचा २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी विमान कोसळून मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी कोण सांभाळणार? या प्रश्नाभोवती चर्चेंने फेर धरला होता. त्याला शुक्रवारी सायंकाळी पूर्णविराम मिळाला आहे. गुरुवारीच पक्षाचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करावे, म्हणत चर्चेंला तोंड फोडले होते. त्यानंतर पक्षातूनही तशीच मागणी झाली. 

शुक्रवारी सकाळपासूनच यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या होत्या. पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर पटेल यांनी जनभावनेचा विचार करूनच निर्णय घेतला जाईल, असे सांगत तसे संकेत दिले होते. 

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी रात्री विधीमंडळ सचिवालयाकडे पत्र दिले आहे. उद्या पक्षाच्या आमदारांची बैठक होणार असून, या बैठकीत गटनेत्याची निवड केली जाणार आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडणार आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते आणि पक्षाच्या प्रचाराचे काम करणारे नरेश अरोरा यांनी सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा केली. या नेत्यांसोबत झालेल्या चर्चेत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास होकार दिला. सुनेत्रा पवार यांनी होकार दिल्यानंतर विधिमंडळ बैठक बोलवण्याचा आणि शपथविधी करण्याच्या हालचालींना वेग आला. शनिवारी (३१ जानेवारी) दुपारी विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. आमदारांच्या उपस्थितीत गटनेते पदी निवड केली जाणार आहे. त्यानंतर शपथविधी होणार आहे. 




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रविवार पेठ आणि ढोर गल्ली येथे सातारा शहर आणि शाहूपुरी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा
पुढील बातमी
सातारा शहरात राजकारणाचे एक संतापजनक रूप समोर; प्रचारासाठी छ. संभाजीनगरहून २६ महिलांना बोलविले, एसटी स्टँडवर कोणी न्यायलाच आले नाही

संबंधित बातम्या