सातारा : महाराष्ट्रातील गडकोट किल्ले आणि ऐतिहासिक स्थळांवर कायमस्वरुपी भगवा झेंडा उभारावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे माजी सातारा शहराध्यक्ष, भाजपा सातारा जिल्हा कोअर कमिटी सदस्य विकास गोसावी यांनी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री ना आशिष शेलार यांच्याकडे, जिल्हाध्यक्ष अतुलबाबा भोसले, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत केली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवा झेंडा घेऊन स्वराज्य स्थापन केले आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी ते वाढवले. त्यानंतरच्या काळात मावळ्यांनी अटकेपार भगवा झेंडा फडकवला. असे असताना सुद्धा महाराष्ट्रातील किल्ल्यांवर आणि ऐतिहासिक स्थळांवर भगवा झेंडा दिसत नाही.
काही दिवसांपूर्वी आलेल्या एका व्हिडिओमध्ये अत्यंत वाईट गोष्ट दिसत आहे. महाराष्ट्रामध्येच असलेल्या जंजिरा किल्ल्यावर आणि परिसरात भगवा झेंडा नेण्यासाठी आणि फडकवण्यासाठी मनाई केली जात आहे, हे अत्यंत चुकीचे आहे.
महाराष्ट्रातील एखाद्या किल्ल्यावर किंवा ऐतिहासिक स्थळावर भगवा झेंडा लावू देऊ नये किंवा फडकण्यासाठी अटकाव केला जात असेल तर ही गोष्ट कधीही सहन केली जाणार नाही.
महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांवर आणि ऐतिहासिक स्थळांवर सुद्धा कायमस्वरूपी भगवा झेंडा फडकवण्याची व्यवस्था करण्यात यावी आणि त्याची निगा राखण्यासाठी शासकीय यंत्रणा उभारावी. ज्यामुळे गड-किल्ल्यांवर अतिक्रमण होणार नाही आणि त्या ठिकाणची स्वच्छता राखली जाईल. तसेच पावित्र्य जतन होईल. याचबरोबर प्रत्येक किल्ल्यांवर आणि ऐतिहासिक स्थळांवर, त्या किल्ल्याचे, त्या स्थळाचे नाव लांबून दिसेल इतके मोठे उभारण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. या निवेदनाची प्रत माहिती आणि कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आली आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष पंकज चव्हाण, सातारा जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, सातारा जिल्हा संवादक प्रवीण शहाणे, चंदूभैय्या धुळप, डॉक्टर मैथिली धुळप, स्वाती गानू आणि पदाधिकारी उपस्थित होते.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
