सातारा : दोन दिवसानंतर नवरात्रीला सुरुवात असून देवीच्या आगमन मिरवणूकीला पोलिसांकडून परवानगी दिली जाणार नसल्याची स्पष्ट भूमिका घेण्यात आली. याशिवाय डीजेलाही परवानगी देणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, नवरात्रीच्या बंदोबस्तासाठी पोलिस तयार असून चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे.
सातारा शहर पोलीस ठाणे व शाहूपुरी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी दुपारी शिवतेज येथे नवरात्रीच्या अनुषंगाने बैठक झाली. यावेळी नवरात्र उत्सव मंडळ व गरबा आयोजकांचीही उपस्थिती होती. डीवायएसपी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक घेण्यात आली.
बैठकीमध्ये पोलिसांकडून अनेक सूचना
या बैठकीमध्ये पोलिसांकडून अनेक सूचना करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने कमानी लावू नयेत. मूर्तींची उंची जास्त नसावी. डीजेला परवानगी नाही. पारंपारिक वाद्य वाजवावेत. फ्लेक्स उंचावर लावू नयेत. लेझर बीमलाईटचा वापर करू नये. स्ट्रक्चर मोठे नसावे. दांडिया भरवणाऱ्या आयोजकांवर कार्यक्रमाची सर्वस्वी जबाबदारी राहील. नवरात्र उत्सव मंडळांनी स्वयंसेवक नेमावे. आगमन मिरवणुकींना परवानगी नाही. मंडळांनी सीसीटीव्ही लावले पाहिजेत. मंडळांनी ध्वनी मर्यादा तसेच कालावधीचा नियमानुसार पालन करावे. देवींच्या दागिन्यांची सर्व जबाबदारी मंडळाचे पदाधिकारी यांची राहील. विसर्जन मिरवणुका मुद्दाम कोणीही रेंगाळत ठेवू नयेत अशा सूचना देण्यात आल्या. दरम्यान, मिरवणूक मार्ग कमानी हौद ते मोती चौक यादरम्यान कोणीही गुलालाची उधळण व फटाक्यांची आताशबाजी करु नयेत, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
या बैठकीसाठी दुर्गा देवी मंडळावे पदाधिकारी, गरबा आयोजक असे सुमारे ६० जण उपस्थित होते. यावेळी मंडळांच्या पदाधिकारी यांनीही डीजे लावणार नसल्याचे सांगून आगमन मिरवणूक पारंपारिक वाद्याशिवाय काढणार असल्याचे सांगितले.