श्री आनंद नटराज, शिवकाम सुंदरी देवीच्या कल्याणोत्सवाने वार्षिक रथोत्सवाची सांगता

by Team Satara Today | published on : 13 January 2025


सातारा :  श्री आनंद नटराज व शिवकामसुंदरी या देवतांच्या कृपेने आणि श्री कांची कामकोटी पिठाचे महास्वामी परमपूज्य शंकराचार्य श्री चंद्रशेखरेन्द्र सरस्वती स्वामी तसेच परमपूज्य श्री जयेंद्र सरस्वती व परमपूज्य विद्यमान पीठाधीपती श्री शंकर विजयेन्द्र सरस्वती स्वामी यांचे पूर्णानुग्रह आणि शुभाशीर्वादाने सातारा येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरातील सर्व देवतांचा वार्षिक रथोत्सव सोहळा  कल्याणोत्सवाने  संपन्न झाला.

नटराज मंदिरामध्ये सोमवारी सकाळी 5 ते12 या वेळेत श्री आनंद नटराज आणि शिवकाम सुंदरी देवी यांच्या पंचधातूच्या भव्य मूर्ती रविवारी संपन्न झालेल्या   रथोत्सव   सोहळ्यानंतर नटराज मंदिरामध्ये गाभाऱ्या पुढील कट्ट्यावर ठेवण्यात आल्या. त्यानंतर मंदिराचे ब्रह्मवृंदांनी या दोन्ही मूर्तींना विशेष अभिषेक घालून महाभिषेक संपन्न केला. असा महाअभिषेक वर्षातून विशेष नक्षत्रांवर एकूण सहा वेळेला केला जातो.

रथसोहळ्याची सांगता सोमवार दि. 13 जानेवारी रोजी पहाटे पाच ते दुपारी बारा या वेळेत पुणे येथील राधाकृष्ण शास्त्री मेमोरियल ट्रस्टच्या वतीने श्री नटराज देवाला महाअभिषेक, लघुरुद्र व शिवकाम सुंदरी व नटराज यांचा  कल्याणोत्सवाने आज करण्यात आली.

 दरम्यान महाभिषेकांमध्ये पाणी, दूध, दही, मध, तूप, चंदन पावडर, भस्म, विविध फळांचे काप, उसाचा रस, नारळ-शहाळ्याचे पाणी आदींनी या दोन्ही मूर्तींना विशेष अभिषेक घातल्यानंतर चंदनचा सुशोभित केलेला असा भव्य हार घालण्यात आला. तसेच विविध अलंकारांनी आणि विविध सुवासिक फुलांच्या  हार आदींनी  या मूर्तींना सजविण्यात आले. त्यानंतर मंगलाष्टका म्हणत ब्रह्मवृंदांनी या दोन्ही मूर्तींमध्ये अंतरपाट   धरून खऱ्या अर्थाने लग्न सोहळा संपन्न केला. लग्न सोहळा संपन्न झाल्यावर सुवासिनींनी नटराज आणि पार्वती देवीची दृष्ट काढून सर्वांच्या कल्याणासाठी आणि रक्षणासाठी प्रार्थना केली. नंतर महाआरती करून महाप्रसाद वितरण करण्यात आला.

यावेळी  पुणे येथील श्री सत्य साई निकेतन हायस्कूल आणि वसुंधरा ग्रीन बायो एनर्जी चे चेअरमन सुदर्शन मुदलियार व त्यांच्या पत्नी सौ. विजयालक्ष्मी मुदलियार, नटराज मंदिराचे व्यवस्थापकीय विश्वस्त  व्यवस्थापकीय विश्वस्त रमेश शानभाग, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.उषा शानभाग, नारायण राव, वासुदेव नायर, व्यवस्थापक चंद्रन, संकेत  शानभाग,  राहुल घायताडे, रमेश हलगेकर, मोहन शानभाग, सौ.प्रभा भट, अभिनव भट, सुहास शहाणे, सौ.कांचन शहाणे यांचे सह राधाकृष्ण मेमोरियल ट्रस्ट पुणेचे पदाधिकारी विश्वस्त आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वेदमूर्ती जगदीश शास्त्री भट्ट गुरुजी आणि वेदमूर्ती दत्ताशास्त्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा रथोत्सव सोहळा संपन्न होण्यासाठी अनेक ज्ञात-अज्ञात शिवभक्तांनी दरवर्षीप्रमाणेच या कामात विशेष परिश्रम घेतले. तसेच शेकडो शिवभक्त तन, मन, धन अर्पण  करणाऱ्या या सर्वांचे नटराज मंदिर विश्वस्त समितीने आभार मानले असून पुढील महिन्यात लवकरच होणाऱ्या महाशिवरात्री महोत्सवाची आता सर्वांना चाहूल लागली असून दहा दिवस संपन्न होणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्तच्या संगीत, नृत्य, कला महोत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी याबाबत लवकरच घोषणा करण्यात येईल असे मंदिर व्यवस्थापनांकडून सांगण्यात आले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सुबोध भावेचा ‘संगीत मानापमान’ पाहून बॉलिवूड अभिनेत्री भारावली
पुढील बातमी
आता समृद्धी महामार्गावरून गाठा दिल्ली

संबंधित बातम्या