सातारा : शाहू चौक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरातील सुविधा तेथे होणारी अतिक्रमणे तसेच होर्डिंगच्या जागांमुळे स्मारकाला येणारा अडथळा या समस्या तात्काळ सोडवल्या जाव्यात यासाठी स्मारक समितीच्या सदस्यांनी पुतळा परिसरामध्ये शुक्रवारी धरणे आंदोलन केले. नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी या प्रकरणी प्रशासनांना तात्काळ सूचना द्याव्यातमी अशी मागणी समिती सदस्यांच्या शिष्टमंडळाचे प्रमुख चंद्रकांत खंडाईत यांनी केली. या आंदोलनाची दखल नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी घेत आंदोलकांशी यावेळी चर्चा केली व या सर्व समस्या तातडीने सोडवण्याचे आश्वासन दिले.
सातारा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने पुतळा परिसरातील विविध समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले. पुतळा परिसराची जागा अरुंद असल्याने मागील बाजूची गृहविभागाची सुमारे २० फूट रुंद व १०० फूट लांब जागा सुशोभीकरणासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच परिसरातील स्वच्छता, बाग-बगीच्यांची देखभाल, सीसीटीव्ही बसविणे, लाईट व कारंजे दुरुस्ती, सांस्कृतिक सभागृहासाठी खुर्च्या व ध्वनीव्यवस्था उपलब्ध करणे आणि परिसरात फ्लेक्स, टपऱ्या व पार्किंग बंदी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
समितीच्या सदस्यांनी शुक्रवारी दिवसभर या विविध मागण्यांसाठी व नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरता धरणे आंदोलनाचा पवित्रा घेतला तसेच पुतळा परिसरामध्ये जोरदार घोषणाबाजी करत आमच्या मागण्या मान्य करा अशी मागणी केली. या आंदोलनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समितीचे सचिव गणेश कारंडे श्रीरंग वाघमारे बाळासाहेब जगताप बी एल माने संघटक भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष संगीता डावरे वंचित बहुजन आघाडीचे महासचिव दादासाहेब केंगार योगेश कांबळे अजित कांबळे विलास वाहागावकर इत्यादी पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते .नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी घटनास्थळी येऊन आंदोलकांशी चर्चा केली व त्यांच्या सर्व मागण्यांवर चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.