सातारा : भारत सरकारच्या Semivision 2025 या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत सातारा आयटी पार्क परिसरात सेमीकंडक्टर उद्योग उभारणीसाठी सुमारे १३२ एकर जमीन MIDC तर्फे निश्चित करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने सेमीव्हिजन २०२५ या सेमिनारचे आयोजन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड यांच्या सभागृहामध्ये 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेस करण्यात आल्याची माहिती आयोजक रणजित येवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सेमीकंडक्टर उद्योग हा भारताच्या आत्मनिर्भरतेसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक ठरणार असून, इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत देशातील अनेक नामांकित कंपन्या – वेदांचा पॉपकॉर्न डिस्कवर टेक्नॉलॉजी टाटा इलेक्ट्रॉनिक्स,पॉलीमेथ, एसपीईएल, सेमी कंडक्टर या क्षेत्रात सक्रिय आहेत. सातारा जिल्ह्यातील प्रगत शैक्षणिक संस्था आणि तंत्रज्ञानप्रेमी विद्यार्थी वर्गामुळे हा प्रदेश उद्योग स्थापनेसाठी आदर्श ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत व्हिएल एसआय, एम्बेडेड सिस्टीम, चिप टू स्टार्ट अप यांसारख्या क्षेत्रात प्रशिक्षण, संशोधन आणि रोजगार निर्मितीवर भर दिला जाणार आहे. बी.ई., बी.टेक, एम.ई., एम.टेक, बी.एस्सी., एम.एस्सी. (फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कंप्यूटर इन्स्ट्रुमेंटेशन) अशा विद्यार्थ्यांसाठी या क्षेत्रात करिअरच्या विस्तृत संधी उपलब्ध होणार आहेत.
प्रशिक्षण आणि संशोधन सुविधा
सेमीव्हिजन २०२५ अंतर्गत सातारा आयटी पार्क येथे R&D Unit स्थापण्यात येणार आहे. यामध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा, प्रशिक्षण केंद्रे, Electronics Design Labs उभारण्यात येतील.
प्रकल्पामुळे होणारे फायदे:
सातारा जिल्ह्यात नवे उद्योग उभारणीचे मार्ग मोकळे
उच्च तंत्रज्ञान शिक्षण आणि रोजगार एकत्र उपलब्ध
स्थानिक तरुणांसाठी १०,००० हून अधिक रोजगार संधी
महाराष्ट्रात सेमीकंडक्टर उत्पादन आणि डिझाईन क्षेत्रात स्वावलंबन
आयोजकांचे आवाहन
सर्व तंत्रज्ञानप्रेमी विद्यार्थी, उद्योग, शिक्षण संस्थांनी या सेमीकंडक्टर क्षेत्रातील नव्या संधींचा लाभ घ्यावा आणि देशाच्या प्रगतीत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले.