जिल्हा नियोजन समितीच्या सभेत पत्रकार मंडळींना अलाऊड नसल्याने त्या सभेत नेमक्या काय घडामोडी होतात ते समजू शकत नाही. मात्र, नुकत्याच झालेल्या नियोजन समितीच्या सभेत जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता अरुणकुमार दिलपाक हे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या रडारावर होतेच. तसे जिल्हा परिषदेत त्यांची पदोन्नती होण्यापूर्वी ते सातारा पंचायत समिती आणि जावळी पंचायत समितीच्या पाटबंधारे विभागाचे कारभारी होते. त्यांच्या कारभाराबाबत तक्रारी होत्या. तसेच जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागात सुद्धा त्यांच्याबाबत तक्रारी होत्या. तरीही त्यांच्या कामकाजात सुधारणा होत नव्हती आणि जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी सूचना दिल्या तरीही ते त्यांच्या सूचना मानत नव्हते.
नेमक्या त्यांच्या कारभाराबाबत तक्रारीचा वाढता पाढा नियोजन समितीच्या सभेत मंत्री जयकुमार गोरे यांनी मांडला. त्यांनी ठणकावून त्यांच्या स्टाईलने समजून सांगितले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. त्यांचा कारभार अभियंता मोहसीन मोदी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
मंत्री जयकुमार गोरे यांनी अगोदरच सांगितले आहे, काम न करणार्या अधिकारी, कर्मचारी यांची गय करणार नाही. चुकीचे काम कोणी करत असेल तर खपवून घेणार नाही. जिल्ह्यातील सामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टीने सर्वच अधिकारी, कर्मचारी यांनी काम करावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले होते. तसेच त्यांच्या अडकित्त्यात जो अधिकारी सापडतो तो काही केल्या सुटत नाही. यापूर्वी सातारा जिल्ह्याने कृषी विभागाचे अधीक्षक, वन विभागाचे अधीक्षक यांच्याबाबत झालेले किस्से पाहिले आहेत. तर लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता अरुणकुमार दिलपाक हे मुरब्बी असले तरीही त्यांच्याकडून कारभारात सुधारणा होणे अपेक्षित होते. त्या सुधारणा न झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर ही कारवाई झाल्याचे समजत आहे.