सातारा : सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा जनावरांच्या लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. सातारा, खटाव, फलटण, कोरेगाव व माण तालुक्यातील 52 जनावरे लम्पी त्वचारोगाने बाधित आहेत. रोगाच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून विविध उपाययोजना राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यात मे महिन्यापासून पावसाळी वातावरण आहे. त्यामुळे जनावरांच्या लम्पी त्वचारोगाने जिल्ह्यात डोके वर काढले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसह राज्य शासनाचा पशुसंवर्धन विभाग अलर्ट झाला आहे. पशुसंवर्धन विभागाने सातारा जिल्ह्यात युध्दपातळीवर लसीकरण मोहीम राबवली आहे. ज्या ज्या ठिकाणी लसीकरणात जी जनावरे चुकली आहेत त्या ठिकाणी पुन्हा प्राधान्याने लसीकरण मोहीम राबवली आहे. जिल्ह्यातील सातारा तालुक्यात 14, खटाव 8, फलटण 5, कोरेगाव 18, माण 7 असे मिळून 52 जनावरे लंपी त्वचारोगाने बाधित झाली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. ज्या ज्या ठिकाणी लंपी त्वचारोगामुळे जनावरे बाधित झाली आहेत अशा जनावरांवर पशुसंवर्धन विभागामार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत.
पशुपालकांनी जनावरांची आवश्यक ती काळजी घ्यावी. रोगाची लक्षणे आढळल्याबरोबर पशुवैद्यकीय अधिकार्याकडूनच जनावराची तपासणी करून घ्यावी. गोठ्यात गायी व म्हशींना एकत्रित बांधू नये. निरोगी जनावरांना बाधित जनावरापासून वेगळे बांधावे, रोगाचा प्रसार किटकामार्फत होत असल्यामुळे किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. परिसरात स्वच्छता राखावी व निर्जंतुक द्रावणाने परिसरात फवारणी करावी. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व चारा खाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी.
लम्पीच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागामार्फत बाधित झालेल्या ठिकाणी सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. ज्या ठिकाणी जनावरे आजारी आहेत त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येत आहेत.
- डॉ. विनोद पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी