सातारा : सातारा शहरांमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या राजकारणाचा परिघ पालिका निवडणुकांच्या निमित्ताने आणखी व्यापक झाला आहे. 50 पैकी 41 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आले असून नगराध्यक्ष अमोल मोहिते हे 42 हजार 32 मतांच्या फरकाने निवडून आले आहेत. तर महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णाताई पाटील यांना 15,55 मतांवर समाधान मानावे लागले. प्रभाग क्रमांक दोनमध्ये संकेत संजय साठे यांच्या विजयामुळे सातारा पालिकेच्या राजकारणात शिवसेना शिंदे गटाचा चंचू प्रवेश झाला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीची राजकीय रणनीती सपशेल उघडी पडली आहे. त्यांचे 22 पैकी एकही उमेदवार येथे निवडून आले नाही.
अन्न वखार महामंडळाच्या कोडोली येथील गोडाऊनमध्ये सकाळी साडेदहा वाजल्यापासून प्रत्यक्ष निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली. या निकालामध्ये भारतीय जनता पार्टीने अपेक्षेप्रमाणे वर्चस्व राखले. मात्र प्रभाग क्रमांक तीनमध्ये रक्षक प्रतिष्ठानचे सुशील मोझर यांचे दोन अपक्ष उमेदवार तसेच प्रभाग क्रमांक दोन मध्ये संकेत संजय साठे हे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले. त्यामुळे तेथे भारतीय जनता पार्टीच्या गाडीला ब्रेक लागला की काय अशी चर्चा होती, मात्र, नंतर भाजपच्या उमेदवारांचा विजयाचा वारू सुसाट सुटला.
भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते यांनी 57, 587 मते मिळवली महाविकास आघाडीचे उमेदवार सुवर्णाताई पाटील यांना 1555 मतांवर समाधान मानावे लागले शिवसेनेच्या शिंदे गटाने प्रभाग क्रमांक साताऱ्याच्या राजकारणात प्रवेश मिळवला सातारा जिल्ह्यात अमोल मोहिते हे 42000 मतांच्या विक्रमी मताधिक्याने निवडून आले आहेत. भारतीय जनता पार्टीने शहराच्या राजकारणावर तसेच जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड निर्माण केली आहे. महाविकास आघाडी यंदा बाजी पलटवणार अशी सातारा शहरात चर्चा होती मात्र महाविकास आघाडीचा प्रत्यक्ष प्रभाव कुठेही जाणवला नाही. 22 उमेदवारांचा पराभव झाला यंदाच्या नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेत नव उमेदवार होते यामध्ये शरद काटकर यांनी लक्षणीय 4000 मते घेतली, तर अभिजीत बिचुकले यांनाही 2332 मते मिळाली. शिक्षक परिषदेचे कार्यवाह सुधीर विसापुरी यांनाही 1000 मते मिळाली.
प्रस्थापितांना अपक्षाने दिला फटका
सातारा शहरातील काही लक्षवेधी लढती अत्यंत चर्चेचा ठरल्या प्रभाग क्रमांक 21 मध्ये नगर विकास आघाडीचे दिग्गज अशोक मोरे यांचा सागर पावशे या अपक्ष उमेदवाराने पराभव केला .या पराभवाची जोरदार चर्चा झाली मोने यांच्या तब्बल 37 वर्षाच्या राजकीय कारकीर्दीला या निमित्ताने ब्रेक लागला आहे. दुसरीकडे प्रभाग क्रमांक14 मध्ये दिनाज शेख या 887 मतांनी विजयी झाल्या त्यांनी स्मिता घोडके यांचा पराभव केला. घोडके यांना 1759 मते मिळाली. मुस्लिम बांधवांनी आपली या प्रभागातील नाराजी या निमित्ताने दाखवून देत अपक्ष दिनाज शेख यांना निवडून दिले.
प्रभाग क्रमांक 16 मध्ये सुद्धा ऍड. दत्ता बनकर आणि शिंदे गटाचे संभाजी पाटील यांच्या राजकीय संघर्षाची चर्चा होती. अपेक्षेप्रमाणे येथे दत्ता बनकर 1039 मध्ये मिळून विजयी झाले तर संभाजी पाटील यांना 784 मध्ये मिळाली. येथे 49 टक्के मतदान झाल्याने राजकीय धाकधूक वाढली होती मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. प्रभाग क्रमांक 18 मध्ये सुद्धा शेखर मोरे यांचा अपक्ष उमेदवार विनोद मोरे यांनी पराभव केला अण्णासाहेब मोरे यांना १६४९ विनोद मोरे यांना 1911 मते मिळाली -येथे मोरे भावकीचा कौलमिळाल्याने विनोद मोरे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. उदयनराजे समर्थक प्रशांत आहेरराव हे सुद्धा आता सातारा पालिकेत दाखल झाले आहेत. त्यांनी प्रभाग 21 मधून संतोष पवार यांचा 30 मतांनी पराभव केला. ही अत्यंत संघर्षपूर्ण येथे लढत झाली. या लढतीची साताऱ्याच्या राजकारणात जोरदार चर्चा होती .भाजपने पवार यांच्या मागे मोठी रसद उभी केली तरी मतदाराने आहे आहेरराव यांना निसटत्या विजयाचा कौल दिला.
शिवेंद्रसिंहराजे यांची रणनीती यशस्वी
सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची रणनीती यशस्वी झाली. त्यांनी सातारा जिल्ह्यातील सात नगरपालिकामध्ये भाजपचे उमेदवार निवडून आणलेच. शिवाय सातारा शहरांमध्ये सुद्धा 41 नगरसेवक आणि भाजपचा नगराध्यक्ष निवडून आणला. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमदार अतुल भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे तसेच कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी सुद्धा त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व राहील अशी राजकीय तजवीज करत तेथे आपले उमेदवार निवडून आणले. साताऱ्यामध्ये शिवेंद्रसिंहराजे यांनी एक हाती प्रचाराची कमान सांभाळली. तेथे त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची उणीव जाणून दिली नाही. मात्र काही ठिकाणी उमेदवारांची निवड चुकल्याचे अपक्ष नऊ उमेदवारांच्या निमित्ताने दिसून आले आहे. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर या निमित्ताने आपली पकड मजबूत ठेवली असून भारतीय जनता पार्टीच्या चार आमदारांनी आगामी सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपची रणनीती आक्रमक राहील असाच संदेश या निमित्ताने दिला आहे.