'मन में है अंधविश्वास, देश का सत्यानाश..'

कुणाल कामराने गाण्यातून पुन्हा डिवचलं

by Team Satara Today | published on : 26 March 2025


मुंबई :  स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक टीकेमुळे राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. या विनोदामुळे शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आणि त्यांनी जोरदार निषेध नोंदवला. रविवारी या शोची क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर हा वाद आणखी चिघळला. त्यानंतर शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी हॅबिटॅट क्लबमध्ये तोडफोड केली. या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई करत 12 जणांना अटक केली, मात्र सोमवारी त्यांना जामीन मिळाला.

याशिवाय, शिवसेनेच्या 40 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कुणाल कामराचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबनात्मक गाण्यानंतर, आता आणखी एक गाण्याचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. खरंतर हा व्हिडिओ नवा नसून काही वर्षांपूर्वीचा आहे. तरीही सध्या एकनाथ शिंदेंवरील टीकेमुळे सुरू झालेल्या वादामुळे कामराचे हे जुने व्हिडिओ देखील पुन्हा व्हायरल होऊ लागले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

कुणाल कामराने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. “‘हम होंगे कंगाल एक दिन, मन में है अंधविश्वास, देश का सत्यानाश. होंने नगे चारों ओर, करेंगे दंगे चारों ओर पुलिस के पंगे चारों ओर. एक दिन मन में नथूराम, हरकतें आसाराम. ‘हम होंगे कंगाल एक दिन” अस तो गाताना दिसत आहे.

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त गाणं म्हटलं होतं. खार येथील एका क्लबमध्ये कुणाल कामराने ठाणे की रिक्षा असं विडंबनात्मक गाणं गाऊन एकनाथ शिंदेंवर टीका केली होती. हे गाणं समोर आल्यानंतर संतप्त शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी जिथे कुणाल कामराने शो केला होता त्या क्लबची तोडफोड केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील वादग्रस्त गाण्यावरुन राज्यभरात कुणाल कामराविरोधात आंदोलन करण्यात आलं. कुणाल कामरावर कठोर कारवाई करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबची तोडफोड देखील केली.

या प्रकरणात कुणाल कामराला पोलिसांनी Whats App द्वारे समन्स बजावलं होते. कुणाल कामराविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे गुन्ह्याच्या चौकशीसाठी त्याने हजर राहावे, यासाठी त्याला समन्स पाठवण्यात आल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं होतं.

खार पोलीस स्टेशनमधील कर्मचारी सोमवारी कुणाल कामराच्या घरी गेले होते. कुणालच्या घरी त्याच्या आईवडीलांना समन्सची एक कॉपी देण्यात आली आहे. दरम्यान या सगळ्या प्रकारानंतर कुणाल कामरा महाराष्ट्राबाहेर आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला Whats App वरही समन्स पाठवलं आहे. आता पोलिसांच्या समन्सनंतर कुणाल कामरा नेमका चौकशीसाठी कधी येणार, हे पाहावं लागेल. सोमवारी 24 मार्चला शिवसैनिक आक्रमक झाले होते. त्यामुळे कुणालच्या घराच्या आसपास पोलीस तैनात करण्यात आले होते. दरम्यान यावर कुणाल कामराने मुंबई पोलिसांना एक पत्र लिहिलं असून चौकशीला हजर राहण्यासाठी एक आठवड्याचा अवधी मागितला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वाहनांवर यापुढे मराठीतूनच संदेश बंधनकारक
पुढील बातमी
पुरुषांपेक्षा महिलांच्या हृदयरोगाची लक्षणे फार वेगळी

संबंधित बातम्या