सातारा : वाई तालुक्यातील विविध कृषी प्रकल्पांना आणि शेतकऱ्यांच्या श्रमदानातून खुल्या करण्यात आलेल्या पाणंद रस्त्याला भेट देऊन सुरू असलेल्या उपक्रमांची जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पाहणी केली. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांतर्गत राबविण्यात येणाऱ्या कामांचे त्यांनी कौतुक केले.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे, तहसीलदार सोनाली मेटकरी, आत्मा प्रकल्प संचालक अजय शेंडे, पुरवठा साखळी तज्ज्ञ शशिकांत घाडगे,तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांचे भागधारक शेतकरी
जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी कवठे येथील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त राज्यातील उत्कृष्ट शेतकरी उत्पादक सहकारी संस्था, तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतर्गत समृद्धी शेतकरी उत्पादक संस्थेच्या ब्रॅण्डिंग व पॅकेजिंग प्रकल्पाला भेट दिली. त्यानंतर कविता लोखंडे यांच्या हळद प्रक्रिया उद्योगाची पाहणी केली.
कवठे येथील शेतकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियाना अंतर्गत श्रमदान करून पाणंद रस्ता खुला केला. जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी या रस्त्याला पक्का करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याची तरतूद करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी विठ्ठलवाडी येथील सुंबरान गोट फार्म, तसेच शहाबाग येथील व्हॅली ऑफ बेरीज् अध्यक्ष उमेश खामकर यांच्या सेंद्रिय हळद व स्ट्रॉबेरी प्रक्षेत्राची पाहणी केली. त्यानंतर यानंतर वाई येथील मेगा फार्म अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या स्ट्रॉबेरी प्रक्रिया युनिटला, तसेच शिंदे फूड प्रॉडक्ट्स यांच्या रेलिश उत्पादन युनिटला भेट देऊन उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला.