सातारा : कोरेगाव तालुक्यातील अंबवडे संमत वाघोली येथे मंगळवारी सायंकाळी थरारक आणि भीषण घटना घडली. अंबवडे चौकातील दत्तात्रय स्वामी कलेक्शन या कापड दुकानात १० ते ११ जणांच्या जमावाने अचानक घुसखोरी करत प्राणघातक हल्ला केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. जुन्या वादाचा राग मनात धरून केलेल्या या हल्ल्यात लोखंडी रॉड, बेसबॉलचे लाकडी दांडके तसेच लोखंडी धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला. या अमानुष मारहाणीत पाच जण जखमी झाले असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आशिष अधिक सकुंडे, विशाल बजरंग सकुंडे, वैभव नंदकुमार सकुंडे, यश हरिचंद्र सकुंडे, प्रकाश श्रीरंग सकुंडे, आकाश नंदकुमार सकुंडे, निशांत जितेंद्र सकुंडे, प्रज्वल संतोष सकुंडे, धीरज विजय लेंभे, दिलीप सकुंडे व प्रतीक अधिक सकुंडे (सर्व रा. आंबवडे संमत वाघोली, ता. कोरेगाव) यांनी संगनमताने दुकानात प्रवेश करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला.
या हल्ल्यात लक्ष्मण पंढरीनाथ सकुंडे, स्वप्निल मारुती सकुंडे, निखिल मारुती सकुंडे, रामचंद्र सकुंडे व श्रेयस लक्ष्मण सकुंडे (सर्व रा. आंबवडे संमत वाघोली) हे गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत. यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असून सर्व जखमींवर सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान, हल्ल्यावेळी दुकानात उपस्थित असलेले मारुती सकुंडे, सविता मारुती सकुंडे व पद्मिनी शहाजी गोळे यांनाही जमावाने मारहाण केल्याची माहिती आहे. घटनेनंतर अंबवडे चौक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी वाठार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून लक्ष्मण पंढरीनाथ सकुंडे यांनी फिर्याद दिली आहे. याबाबतचा अधिक तपास वाठार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने करत आहेत.