सातारा : महाराष्ट्राच्या राजकारणात स्पष्टवक्तेपणा, निर्भीड भूमिका आणि संघर्षशील नेतृत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ नेत्या, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतरावदादा पाटील यांच्या पत्नी, माजी महसूल मंत्री, खासदार व आमदार डॉ. शालिनीताई वसंतदादा पाटील यांचे शनिवारी (दि. २०) दुपारी ३ वाजून ४८ मिनिटांनी मुंबईतील माहीम येथील ‘ज्योती सदन’ या निवासस्थानी निधन झाले. त्या ९४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने परखड विचारांची, कोणत्याही दबावाला न झुकणारी आणि आयुष्यभर संघर्षाला सामोरे जाणारी एक धगधगती राजकीय व्यक्तिमत्त्व गमावले आहे.
डॉ. शालिनीताई पाटील यांचा जन्म ८ ऑगस्ट १९३३ रोजी कोरेगाव तालुक्यातील कुमठे येथे झाला. सत्यशोधक विचारपरंपरेतील ज्योत्याजीराव फाळके पाटील यांच्या त्या कन्या होत. त्यांनी कोल्हापूर येथून बी.ए. एल.एल.बी. आणि मुंबई विद्यापीठातून पीएच.डी. पूर्ण केली. कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर सामाजिक अन्यायाविरोधात आवाज उठवणे, दुर्बल घटकांच्या बाजूने ठामपणे उभे राहणे हीच त्यांच्या सार्वजनिक जीवनाची ओळख ठरली.
त्यांनी राजकीय कारकीर्दीची सुरुवात १९६७ साली सांगली जिल्हा लोकल बोर्डाच्या अध्यक्ष म्हणून केली. १९८० साली सांगली विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत त्यांनी महसूल तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद भूषवले. पुढे त्या सांगली लोकसभा मतदारसंघाच्या खासदारही राहिल्या. १९९९ ते २००९ या कालावधीत कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत त्यांनी तालुक्याच्या विकासात मोलाचा वाटा उचलला. वसना-वांगणा उपसा जलसिंचन योजना मार्गी लावून दुष्काळी भागाला दिलासा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची स्थापना, महिला सहकारी बँकेची उभारणी, जिजामाता ट्रस्टमार्फत रुग्णालये, तर ज्योत्याजीराव फाळके ट्रस्टमार्फत शैक्षणिक संस्था उभारून त्यांनी सहकार, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात भरीव काम केले. आरक्षणाच्या मुद्द्यावर आर्थिक निकषांची भूमिका मांडत त्यांनी तत्कालीन राजकीय प्रवाहाला थेट आव्हान दिले. विचारांशी तडजोड न करता त्यांनी ‘क्रांतीसेना’ पक्षाची स्थापना केली आणि संपूर्ण राज्यात आक्रमक भूमिका मांडली.
त्यांच्या पश्चात दोन पुत्र चंद्रकांत वसंतदादा पाटील व राजेंद्र वसंतदादा पाटील, दोन कन्या, सुना, जावई, नातवंडे व परतवंडे असा मोठा परिवार आहे. रविवारी सकाळी ८ ते ११ या वेळेत सातारारोड येथील चंद्रकांत वसंतदादा पाटील विद्यालय (जुने कुपर हायस्कूल) येथे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, त्यानंतर साडेअकरा वाजता पाडळी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
डॉ. शालिनीताई पाटील यांचे जीवन म्हणजे संघर्ष, निर्भीडपणा आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम होता. त्यांचे स्पष्ट विचार आणि लढवय्या वृत्तीचा वारसा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कायम स्मरणात राहील.