मेढा : जावळी पंचायत समिती व जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी तालुक्यात तीन गट आणि सहा गणांमध्ये निवडणूक होत आहे. यामध्ये खरी लढतही मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादी (शरद पवार) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यात होत आहे. अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होणार आहेत.
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तीनही गटांत तिरंगी लढती होणार आहेत. या निवडणुकीत मंत्री शिवेंद्रसिंहराजे यावेळी भाजपच्या माध्यमातून मैदानात आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी (शरद पवार) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे आपल्या जन्मभूमीत पुन्हा आपल्या नव्या जुन्या कार्यकर्त्यांना घेऊन रणांगणात स्वतः उतरले आहेत.
या निवडणुकीत राष्ट्रवादी (शरद पवार) व शिंदेसेना यांची युती झाली असून कुसुंबी गट व गणात तीनही उमेदवार हे भाजपच्या निशाणीवर निवडणूक लढवत आहेत. कुडाळ व म्हसवे गटात व गणातही युती झाली असून तेथील सहा उमेदवार हे राष्ट्रवादी (शरद पवार)च्या पक्ष चिन्हांवर निवडणूक लढवत आहेत. मतदारांची मतदानावेळी दोन चिन्हांवरून गफलत होऊ नये, एका एका चिन्हांवर निवडणूक लढविण्याचा विचार केला आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाच्या पाचही उमेदवारांनी माघार घेतली. जावळीत स्थानिक राजकीय सोयीसाठी शिंदेसेना शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. दोघांचेही समीकरण जुळल्याने भाजपसमोर आव्हान उभे राहिले आहे. ही निवडणूक शशिकांत शिंदे यांच्या राजकारणाची दिशा ठरवणारी तर शिवेंद्रराजे यांच्या अस्तित्वाची ठरणार आहे.