मतदार जागृती ही निरंतर प्रक्रिया - यशेंद्र क्षीरसागर; मतदान करणे ही सहज भावनेने केलेली उत्स्फूर्त कृती असावी

by Team Satara Today | published on : 08 February 2026


सातारा : "मतदार जागृती ही निरंतर प्रक्रिया असून; मतदान करणे ही सहज भावनेने केलेली उत्स्फूर्त कृती असावी . खरे तर भारतासारख्या लोकशाही प्रधान देशात त्यासाठी प्रबोधन करावे लागू नये ,अशी अपेक्षा आहे. तथापि १०० टक्के मतदान होईपर्यंत प्रबोधन चालूच राहील. कारण, मतदान करणे बळकट लोकशाहीसाठी आपले परम कर्तव्य आहे,"असे प्रतिपादन येथील पंचायत समितीचे सांख्यिकी विस्तार अधिकारी  यशेंद्र क्षीरसागर यांनी केले. 

नुकतेच जिल्हा परिषदेसाठी सुमारे 68 टक्के मतदान झाले या पार्श्वभूमीवर त्यांनी आपले अनुभव कळविले आहेत. "लोकशाही ,संविधान  आणि समाजातील घटकांची भूमिका" या विषयावर श्री. क्षीरसागर सातत्याने कार्य करीत आहेत. लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी तसेच; नुकतेच त्यांनी खटाव तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृती साठी विविध उपक्रम राबविले. त्यासाठी त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर गटविकास अधिकारी योगेश कदम यांनी प्रोत्साहन दिले आणि मार्गदर्शन केले.

कविता, लेख, ऑडिओ जिंगल, समाज माध्यमातून प्रसार इत्यादी प्रकारे त्यांनी मतदान जनजागृतीचा प्रयत्न केला. श्री.क्षीरसागर पुढे म्हणाले," मतदानाचे आणि लोकशाहीचे महत्त्व समाजातील तरुण, ज्येष्ठ नागरिक ,महिला अशा सर्वच घटकांच्या मनावर बिंबवायला हवे. त्यासाठी राज्यघटनेचे महत्त्व तळागाळात पोहोचायला हवे. विद्यार्थी सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणूनच या भावी नागरिकांची मदत संपूर्ण मतदान जनजागृती प्रक्रियेत घेण्यात येत असते. समता, बंधुता ,सामाजिक न्याय ,स्वातंत्र्य या मूल्यांची पेरणी जर बालहृदयात झाली तर लोकशाही अधिकाधिक प्रगल्भ होत जाईल. 'मतदान करा' असे प्रबोधनातून नागरिकांच्या मनावर ठसवले जाते. तथापि एका क्षणी मतदान करणे ही ही सहज कृती व्हायला हवी, अशी अपेक्षा आहे. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे .या उत्सवात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे." मतदान कोणाला करावे" हा प्रत्येक नागरिकाचा स्वतःच्या विवेकबुद्धीने घेतलेला अधिकार असून मतदान कोणालाही करा; पण मतदान करणे हे मात्र सर्वांचेच पवित्र कर्तव्य आहे. 1955 मध्ये तब्बल 70 वर्षांपूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सुद्धा निवडणुकीचे आणि लोकशाहीच्या पावित्र्याचे महत्त्व वर्णन केले आहे मतदान करणे कसे गरजेचे आहे, मतदान करताना काय काळजी घ्यावी, नेता कसा असावा या सर्व गोष्टींची सांगोपांग चर्चा त्यांनी त्यांच्या ग्रामगीतेतून केली आहे. मतदान नव्हे करमणूक असे त्यांनी स्पष्ट बजावले आहे. घडवण्याची ही संधी आहे अशी जाणीव त्यांनी करून दिली आहे म्हणूनच मतदान जनजागृतीसाठी सुशिक्षित, सुसंस्कृत आणि जाणकार व्यक्तींनी नि;स्वार्थीपणे पुढाकार घेऊन ही प्रक्रिया सातत्याने सुरू ठेवायला हवी." जर आपणास चांगले जीवन सर्व सुविधा उत्कृष्ट सार्वजनिक व्यवस्था हवी असेल तर मतदान करण्यामुळे आपल्याला तात्विक आधार मिळतो. असे देखील ते म्हणाले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विकासाची गंगा सामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक - अर्थसंकल्पावरील चर्चेत डॉ. विजय कुंभार; आम्ही पुस्तकप्रेमी समूह, दीपलक्ष्मी पतसंस्था यांच्यातर्फे केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चा
पुढील बातमी
कोणीच धक्क्यातून सावरलेले नाही... त्यामुळे मी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला - खा. उदयनराजे भोसले; कोणत्याही कार्यक्रमांचे आयोजन करू नये

संबंधित बातम्या