महावितरण कार्यालयांची पुनर्रचना

महसूल देयके व देखभाल दुरूस्तीसाठी स्वतंत्र यंत्रणा

by Team Satara Today | published on : 15 October 2025


 बारामती  : दैनंदिन कामकाजात सुसुत्रता यावी, या हेतूने महावितरणने उपविभाग व शाखा कार्यालयांची पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेची नुकतीच अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. महसूल देयके व देखभाल दुरूस्ती  (संवसु) अशी विभागणी करून उपविभाग व शाखा कार्यालयाची फेररचना करून स्वतंत्रपणे यंत्रणा तयार करण्यात आली आहे.

देखभाल व दुरुस्ती  (संवसु) उपविभागातील अभियंते व तांत्रिक संवर्गातील कर्मचारी विद्युत यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीची कामे, नवीन विद्युत यंत्रणा उभारणी कामे, नवीन वीजजोडणी देणे, वीजपुरवठ्याशी संबंधित तक्रारींचे निवारण, वीजसेवा  सुरळीत ठेवणे ही कामे करतील.  तर महसूल व देयके उपविभागातील अभियंते, कर्मचारी  वीज देयक विषयक कामे,  देयक विषयक तक्रारींचे निवारण, वीज देयकांची थकबाकी वसुली ही कामे करतील. 

महावितरणमध्ये उपविभाग व शाखा कार्यालयांद्वारे नवीन वीजजोडणी, मासिक वीजबिल विषयक कामे, विद्युत यंत्रणेची नियमित देखभाल, तांत्रिक बिघाड दुरुस्ती, वीजदेयकांची वसुली, वीजहानी कमी करणे आदी कामे केली जातात. त्यामुळे महावितरण यंत्रणेतील अभियंता व तांत्रिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना दैनंदिन वीजसेवाविषयक विविध कामे करावी लागतात. जुनी रचना साधारणपणे 25 वर्षांपूर्वी तत्कालीन ग्राहकसंख्येच्या आधारे करण्यात आली होती.  कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि ग्राहकसेवा यावर होत असलेला परिणाम लक्षात घेऊन वरिष्ठ व्यवस्थापनाने पुनर्रचना करण्यासाठी विशेष समिती स्थापन केली. कर्मचारी संघटनांशी चर्चा करून पुनर्रचनेचे प्रारूप तयार केले. आता या पुनर्रचनेच्या आधारे प्रत्यक्ष कामकाजाला प्रारंभ करण्यात आला आहे.

 शहरी, ग्रामीण व दुर्गम भागांतील ग्राहकसंख्या व भौगोलिक क्षेत्रानुसार उपविभाग व शाखा कार्यालयांची फेररचना केली आहे. ग्राहकसंख्येनुसार अभियंता व तांत्रिक संवर्गातील कर्मचारी नेमले आहेत. सोलापूर मंडळातील यापूर्वीच्या सोलापूर शहर विभागातंर्गत समाविष्ट सोलापूर शहर उपविभाग अ, ब, क, ड, ई या पाच उपविभागाची  फेररचना करण्यात आली आहे. सोलापूर शहर  महसूल व देयके उपविभाग क्रं.1 (पूर्वीचे अ, ब, ड उपविभाग) तर सोलापूर शहर  महसूल व देयके उपविभाग क्रं.2 (पूर्वीचे क, ई उपविभाग), सोलापूर शहर  संचालन व सुव्यवस्थापन उपविभाग क्रं.1 (पूर्वीचे अ, ब उपविभाग), सोलापूर शहर  संचालन व सुव्यवस्थापन उपविभाग क्रं.2 (पूर्वीचे क, ड उपविभाग), सोलापूर शहर  संचालन व सुव्यवस्थापन उपविभाग क्रं.3 (पूर्वीचे ई उपविभाग) अशी नवीन रचना आहे. बारामती व सातारा या ग्रामीण मंडळातील सर्व शाखा कार्यालयांच्या कामकाजाची महसूल देयके व देखभाल दुरूस्ती  अशी विभागणी करण्यात येऊन स्वतंत्रपणे यंत्रणा तयार करण्यात आली आहे. तरी ग्राहकांनी याची नोंद घ्यावी, असे महावितरणचे आवाहन आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वडूज शहरातून स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध संचलन
पुढील बातमी
महिला आयोग आपल्या दारी उपक्रमाचे 16 ऑक्टोबर रोजी आयोजन

संबंधित बातम्या