नगरपालिका निवडणुकीत ना. जयकुमार गोरे ठरणार 'सिंग इज किंग'

सातारा जिल्ह्याच्या स्टार प्रचारकासह सोलापूर जिल्ह्यातील ११ नगरपालिकेची धुरा घेतली खांद्यावर

by Team Satara Today | published on : 16 November 2025


सातारा : सातारा जिल्ह्यात नगरपालिकांसह एका नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला असतानाच, निवडणुकीच्या ऐन प्रचारात माण तालुक्याचे सुपुत्र, राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांची तोफ फलटण, म्हसवड, कराड आणि मेढा येथे धडाडणार असल्याची माहिती प्राप्त होत असून, सातारासह सोलापूर जिल्ह्यातील सध्याची राजकीय समीकरणे पाहता या दोन्ही जिल्ह्यात जयकुमार गोरे 'सिंग इज किंग' ठरणार असल्याची चर्चा खुद्द भाजपात सुरू झाल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील प्रचारासह सोलापूर जिल्ह्यातील ११  नगरपालिकांसह १ नगरपंचायत निवडणुकीची धुरा पक्षाने त्यांच्यावर दिली आहे.

विधानसभा निवडणुका झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत चाणाक्षपणे राज्याचे ग्रामविकास मंत्रीपदासह सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी जयकुमार गोरे यांच्यावर दिली. ग्रामविकास मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी राज्यभरात बैठकांचा धडाका सुरू केला होता. कोणालाही एक रुपया देऊ नका, कोणी लाच मागितली तर थेट मला फोन करा असे छातीठोकपणे सांगणारे ते राज्यातील पहिले मंत्री ठरले आहेत.

ऑक्टोबरमध्ये निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपालिका व काही नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा केली. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, मलकापूर, रहिमतपूर, म्हसवड, फलटण, वाई, पाचगणी आणि महाबळेश्वर या ९ नगरपालिकांसह मेढा नगरपंचायतीसाठी निवडणुका होणार आहेत. निवडणूक प्रक्रियेची धामधूम सुरू असतानाच 'सातारा  टुडे' ने सातारा जिल्ह्यात बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश होणार असल्याचे भाकीत केले होते. ते भाकीत खरे ठरले. या निवडणुकांमध्ये जयकुमार गोरे यांना भाजपने प्रचंड ताकद दिल्याचे स्पष्ट होत असून, प्रचाराच्या रणधुमाळीत फलटण, म्हसवड, कराड आणि मेढा या ठिकाणी जयकुमार गोरे यांच्या तोफा धडाडणार असल्याचे पक्षातील काही सूत्रांनी सांगितले.

फलटणचा समावेश माढा लोकसभा मतदारसंघात झाल्यामुळे सातारा जिल्ह्यात फलटणमधील निवडणुकीत जयकुमार गोरे यांना ताकतीने उतरवण्याची व्युहरचना पक्षाने आखली असल्याचे वृत्त आहे. माण विधानसभा मतदारसंघातील म्हसवड नगरपालिकेची निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची असली तरी या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाकर देशमुख आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाचे अनिल देसाई यांनी शड्डू ठोकला असला तरी, गेल्या १५ वर्षातील माण विधानसभा मतदारसंघातील निवडणुकांचे निकाल आणि विकास कामे पाहता म्हसवड नगरपालिकेची निवडणूक जयकुमार गोरे यांना जड जाईल, अशी परिस्थिती आता राहिली नाही.

सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर जयकुमार गोरे यांनी पक्ष संघटनेचा केवळ विस्तारच केला नाही तर अन्य पक्षातील नाराजांना भाजपमध्ये आणून सोलापूर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवण्यासाठी ताकतीने काम केले. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील ११ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी निवडणुका होत असून भाजपने या निवडणुकांसाठी जयकुमार गोरे यांची निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती केली. भाजपने सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुक स्वबळावर लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र बंडखोरी टाळण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात उद्या सोमवार दि. १७ नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर करण्याची व्यूहरचना आखली आहे. 

एकूणच  सातारा जिल्ह्यासह सोलापूर जिल्ह्यातील निवडणुकांची फार मोठी जबाबदारी पक्षाने जयकुमार गोरे यांच्यावर सोपवल्याचे स्पष्ट झाले असून या दोन्ही जिल्ह्यात त्यांच्या तोफा धडाडणार असल्याने या दोन्ही जिल्ह्यात जयकुमार गोरे 'सिंग इज किंग' ठरणार असल्याचे भाजपामध्ये बोलले जात आहे.

सांगलीतही लक्ष घालावे लागणार...

सांगली जिल्हा आणि जयकुमार गोरे यांचे ऋणानुबंध सर्वांनाच माहित आहेत. सांगली जिल्ह्यातील राजकारणाशी ते परिचित असून राज्य शासनाने पंतप्रधान कार्यालयाच्या महत्त्वकांक्षी प्रॉपर्टी कार्ड वितरण सोहळ्याची सांगली जिल्ह्याची जबाबदारी जयकुमार गोरे यांच्यावर सोपवली होती. भाजप नेत्यांसह सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यांनी एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि दिवंगत डॉ. पतंगराव कदम हेच आपले गुरु असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे जयकुमार गोरे यांना सांगलीतही लक्ष घालण्याच्या सूचना पक्ष नेतृत्वांकडून होऊ शकतात.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
हॉटेल फर्न समोरील 'तो' थांबा ठरतोय 'डेंजर झोन'
पुढील बातमी
जिल्ह्यातील नऊ नगरपालिका व एका नगरपंचायतीसाठी नगरसेवकपदासाठी २९५, नगराध्यक्षासाठी २५ अर्ज दाखल

संबंधित बातम्या