कराड : पेन्शन योजना, शेतकरी सन्मान योजनेतून कर्जाची वसुली करता येत नाही. माझ्या खात्यामधून अशा पद्धतीने रक्कम वसूल होत असल्याने त्याबाबत संबंधित बँकेला कागदपत्रे दाखवली. त्यानंतर पेन्शन योजनेतून कर्ज वसुली बंद होऊन माझे वसूल केलेले आतापर्यंतची रक्कमही परत मिळाल्याचे येथील सेवानिवृत्त बॅँक कर्मचारी लालासाहेब भिसे यांनी सांगितले.
ईपीएफओ पेन्शन व केंद्र शासनाच्या शेतकरी सन्मान योजनेच्या बँक खात्यातून जामीनदार म्हणून रकमेची होणारी वसूल पूर्णतः बेकायदेशीर असल्याचा आरोपही त्यांनी केला. भिसे म्हणाले, की सहकार कायद्याच्या आधारावर त्यांच्या खात्यावर वसुलीसाठी रक्कम कपात करत होती. त्यामुळे त्यांचे पेन्शन व शेतकरी निधी व हक्काची रक्कम सुमारे १० महिने अडवले गेले.
राज्यघटनेच्या कलमानुसार पेन्शन ही संरक्षणाधीन रक्कम आहे. ती कोणत्याही कर्जवसुलीसाठी जप्त करता येत नाही. केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरी सन्मान निधीवरील वसुलीवरही कायदेशीर निर्बंध लावता येत नाहीत. भिसे हे सेवानिवृत्त कर्मचारी असून त्यांचे येथील एका बॅँकेत खाते आहे.
कर्जास जामीनदार असल्याने गेल्या ८ महिन्यांपासून त्यांच्या पेन्शनमधून कर्जाची रक्कम वसूल केली जात होती. त्याबाबत त्यांनी लढा दिला. त्यानंतर त्यांच्या पेन्शनमधून रक्कम वसुली बंद झाली. वसूल केलेली रक्कमही त्यांना परत देण्यात आली.