सातारा नजिकच्या उड्डाणपूलावरील वेग नियंत्रण रामभरोसे ; नवले पुलावरील अपघाताच्या पुनरावृत्तीची भिती

महामार्ग पोलीस कोमात ; आरटीओचे कर्मचारी पावत्या फाडण्यात दंग

by Team Satara Today | published on : 15 November 2025


सातारा : पुणे शहरातील नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातातून महाराष्ट्र अद्यापही सावरलेला नसताना, सातारा शहरानजीक असणाऱ्या महामार्गावरील तीनही उड्डाण पुलावरील वाहनांचे वेग नियंत्रण रामभरोसे असल्याचे अनेकदा स्पष्ट होऊनही अशा मस्तवाल वाहन चालकांवर कसलीच कारवाई होताना दिसत नाही. महामार्गावरील सुरक्षेची जबाबदारी असणारे पोलीस 'कोमात' तर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी केवळ पावत्या पडण्यात दंग असल्यामुळे या तीनही उड्डाण पुलावरून वाहनातून प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ आली आहे. 

बेंगलोर- पुणे महामार्गावर पुणे येथील नवले उड्डाणपुलावर गुरुवारी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू तर २० पेक्षा अधिक जण जखमी झाल्याच्या घटनेने पुरता महाराष्ट्र हादरून गेला. या अपघाताच्या मालिकेमुळे महामार्गावरून प्रवास करायचा की नाही? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. सातारा शहरानजीक अजंठा चौक, बॉम्बे रेस्टॉरंट चौक आणि वाढे फाटा अशा तिन ठिकाणी महामार्गावर उड्डाणपूल आहे. या तीनही पुलावर तीव्र उतार असून या मार्गावरून रोज हजारो वाहने ये-जा करत असतात. कोल्हापूर दिशेने येणारी अनेक खाजगी वाहने प्रवाशांना घेण्यासाठी अजंठा चौकनजीक असणाऱ्या हॉटेल फर्न समोर थांब्यावर आपली वाहने अचानक उभा करतात. पुण्यावरून कोल्हापूरकडे जाणारी वाहने बॉम्बे रेस्टॉरंट उड्डाणपूल उतरल्यानंतर कणसे शोरूमच्याजवळ प्रवाशांना घेण्यासाठी अचानक वाहनांचा वेग कमी करतात. ही दोन्हीही ठिकाणी तीव्र उतारावर असल्यामुळे  अनेकदा अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. हे दोन्हीही थांबे अनधिकृत असताना सुद्धा दोन्ही बाजूंकडून येणारी- जाणारी वाहने नेहमी या ठिकाणी थांबवताना दिसत आहेत. वाढे फाटा उड्डाणपुलावर पुण्याकडे जाताना तीव्र उतार असून या ठिकाणी वेण्णा नदीच्या पुढे प्रवाशांना घेण्यासाठी खासगी वाहने अचानक थांबतात. येथील थांब्यावर सुद्धा कोणाचाही अंकुश नाही. विशेष म्हणजे या मार्गावर महामार्ग पोलिसांची वाहने कधीही पाहायला मिळत नाहीत. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी अपवादात्मक परिस्थितीत पाहायला मिळतात. अवजड वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅव्हल्स यांची जुजबी तपासणी करून दंडात्मक कारवाई करून त्यांना सोडून देण्यात येते. एकूणच सातारा शहरानजीक असणाऱ्या या तीनही उड्डाणपुलावरील अनधिकृत थांबे हे मृत्यूचे सापळे बनत असून वेळीच या अनुधिकृत थांब्यांना आळा न घातल्यास या ठिकाणी नवले पुलावरील दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

आनेवाडी टोलनाक्यावर वाहन तपासणी पॉईंट कशासाठी?

सातारा शहरापासून सुमारे ९ किलोमीटर अंतरावर आनेवाडी टोलनाका असून त्या ठिकाणी टोलच्या पुढे काही अंतरावर रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक पोलीसांचे टोळके नेहमी पाहायला मिळते. संबंधित पोलीस दुचाकीनसह चारचाकी वाहनांचे कागदपत्रे, वाहन चालवण्याचा परवाना, पियुसी आदींची खातरजमा करून पदरात काही पडते का? यासाठी प्रयत्न करतात. हाच पोलीस पॉईंट आनेवाडी टोलनाका परिसरात न ठेवता महामार्गावरील अजंठा चौक, बॉम्बे रेस्टॉरंट आणि वाढे फाटा परिसरातील उड्डाण पुलावरील तीव्र उतारावर ठेवल्यास अमर्याद वेगाने वाहने चालवणाऱ्या चालकांना त्याचा चांगलाच आळा बसण्यासह प्रवाशांचा प्रवासही सुखर होण्यास मदत होईल. याबाबत सातारा जिल्हा पोलीस दल, राष्ट्रीय प्राधिकरण आणि महामार्ग पोलिसांनी एकत्रित येऊन ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महिला सबलीकरण राष्ट्रीय चळवळ व्हावी
पुढील बातमी
गरम पाण्याची बदली अंगावर पडून भाजून जखमी झालेल्या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू; दि. २६ ऑक्टोबर रोजी घडली होती साताऱ्यातील मल्हारपेठेत घटना

संबंधित बातम्या