सातारा : सज्जनगड ठोसेघर मार्गावरील बोरणे गावच्या हद्दीतील मंकी पॉईंट परिसरात एक युवती काही दिवसांपूर्वी दरीत कोसळली होती. सेल्फी काढण्याच्या नादात हा प्रकार घडल्याची चर्चा त्यावेळी परिसरात होती. मात्र ठोसेघर व्यवस्थापन समिती व सातारा तालुका पोलिसांनी अतिशय तत्परतेने घटनास्थळी धाव घेवून या युवतीचे प्राण वाचवले होते. याची दखल घेत सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी ठोसेघर व्यवस्थापन समिती आणि सातारा तालुका पोलिसांच्या कार्याचे कौतुक करुन त्यांचा सत्कार केला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी स्कॉर्पिओ वाहनांमधून पाच पुरुष व दोन युवती ठोसेघरच्या दिशेने जात होते. सज्जनगड घाटामध्ये बोरणे गावच्या हद्दीतील मंकी पॉईंटवर त्यातील एक युवती पावसामध्ये गाडीतून खाली उतरली. सेल्फी काढण्याच्या नादामध्ये ही युवती सुमारे 100 फूट खाली कोसळली. मात्र ही युवती केवळ एका दगडाच्या आधारे दरीत अडकली होती. तिचे वेळीच रेस्न्यू झाले नसते तर प्रसंगी तिचा पाय घसरुन ती त्यापेक्षाही खोल दरीत पडण्याची शक्यता होती.
या घटनेची माहिती समजताच ठोसेघर संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे व्यवस्थापक प्रवीण चव्हाण, समितीमधील सहकारी प्रथमेश जानकर, समाधान काकडे, प्रतीक काकडे, रामचंद्र चव्हाण तसेच सातारा तालुका पोलीस स्टेशनचे अविनाश मांडावे व सागर मदने तातडीने घटनास्थळी दाखल झाले. खोल दरीमध्ये दोरखंड टाकून या कर्मचार्यांनी त्या युवतीला सुखरूपपणे वर आणले. अवघ्या अर्ध्या ते पाऊण तासांमध्ये हे बचाव कार्य करण्यात आले. मात्र दरीत कोसळल्याचा त्या युवतीला प्रचंड धक्का बसला होता. याचबरोबर त्यामध्ये ती जखमी झाली होती. यानंतर संबंधित युवतीला अधिक उपचारासाठी सातार्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याबाबतची माहिती माध्यमांद्वारे पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांना समजली. याबाबतची दखल घेवून त्यांनी संबंधित बचाव पथकास आपल्या कार्यालयात बोलावून त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले तसेच त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. पोलीस अधीक्षकांनी केलेल्या या सत्कारामुळे बचाव पथकातील ठोसेघर संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे व्यवस्थापक प्रवीण चव्हाण, प्रथमेश जानकर, समाधान काकडे, प्रतीक काकडे, रामचंद्र चव्हाण तसेच सातारा तालुका पोलीस स्टेशनचे अविनाश मांडावे व सागर मदने यांचे परिसरातून कौतूक होत आहे.
दरीमध्ये पडलेल्या युवतीला वाचविणार्यांचा पोलीस अधीक्षकांनी केला सत्कार
ठोसेघर व्यवस्थापन समिती व सातारा तालुका पोलिसांच्या बचाव कार्याची घेतली दखल
by Team Satara Today | published on : 06 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा