सातारा : 9 लाखांच्या फसवणूक प्रकरणी तीन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आमच्याकडे स्कीममध्ये पैसे गुंतवल्यास रकमेच्या दुप्पट पैसे अथवा दुप्पट रकमेचे सोेने मिळेल, असे अमिष दाखवून 9 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. धन्यकुमार गोरख माने, शरयू धन्यकुमार माने (रा. राजगुरुनगर, सध्या रा. संगमनगर खेड) व प्रतिक्षा सिद्धार्थ गडांकुश (रा. चिंचणेर, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
अनुराधा विशाल लोहार (वय 27, रा. अंबेवाडी, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली. दि. 21 ऑगस्ट 24 ते 3 ऑक्टोबर 2024 या कालावधीत खंडोबा मंदिराशेजारी असलेल्या स्टार इन्स्पायर ज्वेलर्स प्रा. लि. (गाळा नं. 3, पहिला मजला, इन्फिनिटी वन अपार्टमेंट, सातारा) या दुकानात ही घटना घडली. संशयितांनी लोहार यांना स्कीमचे अमिष दाखवून तसेच 10 हजार रुपयांत 3 ग्रॅम सोन्याचा कॉईन अथवा 20 हजार रुपये परतावा (कालावधी 55 दिवस), ठेव म्हणून ठेवलेल्या पैशांवर 5 टक्के कॅशबॅक अशा विविध स्कीमचे अमिष दाखवून अनेकांकडून 9 लाख 10 हजार रुपये घेतले व त्याचा काहीच परतावा व रक्कमही परत केली नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे. तपास सहायक निरीक्षक कांबळे करत आहेत.
दरम्यान, याच प्रकरणातील संशयित धन्यकुमार माने तसेच शरयू माने यांना आमच्या पैशांचे काय झाले, अशी विचारणा केल्याच्या कारणावरून त्यांनी तू कोण आम्हाला विचारणारी, असे म्हणत जमिनीवर पाडून दगड मारून तसेच चावा घेऊन जखमी केल्याप्रकरणी व मैत्रिणींना शिवीगाळ धमकी दिल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. अनुराधा लोहार यांनीच फिर्याद दिली. दि. 20 रोजी 5.30 च्या सुमारास बीएसएनएलच्या सातारा कार्यालयामागे असलेल्या बासुंदी हॉटेल समोर ही घटना घडली. पोलीस नाईक गोळे तपास करत आहेत.