पालखी सोहळ्याच्या निमित्ताने जर्मन हॅंगर निवारा शेडची उभारणी

by Team Satara Today | published on : 23 June 2025


लोणंद : श्री संत्र ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या आगमनाला केवळ चारच दिवस उरल्याने लोणंद नगरपंचायतीसह सर्वच शासकीय यंत्रणा, सेवाभावी संस्था, संघटना, मंडळांकडून जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान, पालखी तळावर गर्दी नियंत्रणासाठी माऊलींच्या थेट दर्शनासाठी तीन ठिकाणी मोठ्या स्क्रीन लावण्यात येत आहेत. दोन दर्शनरांगांचे लाकडी बांबूचे बॅरिकेड्‌स लावून व्यवस्था केली आहे. बाहेर गावांहून येणाऱ्या व्यावसायिकांनीही दुकाने थाटण्यास सुरुवात केली असून, त्यांचीही तयारीची लगबग सुरू झाली आहे.

माउलींच्या पालखी सोहळ्याचे गुरुवारी (ता. २६) जिल्ह्यात आगमन होत आहे. सोहळ्यातील वारकरी व भाविकांना वीज, पाणी, आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा आदी सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उत्तमरीत्या पुरवण्याच्या दृष्टीने सर्वच शासकीय यंत्रणा कार्यरत झाल्या आहेत. नीरा नदी येथे माऊलींच्या पादुकांना नदीतील दत्तघाटावर पवित्र नीरास्नान घातले जाते. त्या मार्गावर नदीवरील जुना पूल ते दत्त मंदिरापर्यंत सात फूट रुंदीचा काँक्रिटचा रस्ता तयार करून त्यास लोखंडी बॅरिकेड्‌स लावण्यात आले आहेत. या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. परिसराच्या स्वच्छतेचेही काम सुरू आहे. येथील रस्ता व परिसरातील मोकळ्या जागेवर काँक्रिटीकरणासाठी तसेच येथील सर्व अन्य कामांसाठी शासनाकडून २८ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

लोणंद नगरपंचायतीच्या वतीने शहरात स्वच्छता अभियान राबवले जात आहे. दिंड्या उतरणाऱ्या मोकळ्या जागेतील झाडेझुडपे जेसीबी, ट्रॅक्टरच्या साह्याने काढून स्वच्छता केली जात आहे. तळावर विजेच्या दिव्यांचे टॉवर उभारून आकर्षक विद्युत रोषणाई करून स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. तळावर बारीक कच टाकून रोडरोलरच्या साह्याने सपाटीकरण करण्यात येत आहे. पाणीपुरवठ्याची यंत्रणा सज्ज ठेवली आहे. टँकर भरण्याचे पॉइंट निश्‍चित करून तेथे कर्मचारी नेमून व्यवस्था केली आहे. चिखल होणाऱ्या ठिकाणांवर मुरमीकरणाचे काम सुरू आहे. लोणंद बसस्थानकात सातत्याने होणारा चिखलामुळे भाविकांना त्रास सहन करावा लागतो. यासाठी खडी व मुरूम टाकून सपाटीकरण केले आहे. वीज वितरण कंपनीने तळावरील दोन ट्रान्सफॉर्मर बॅरिकेड्‌स लावून सुरक्षित केले आहेत. समाज आरतीच्यावेळी मध्येच येणारा हायमास दिव्यांचा खांब दुसरीकडे हटवण्यात आला. शहरातील रस्त्याच्या कडेच्या झाडांच्या फांद्या तोडून वीजवाहिन्यांची दुरुस्तीची कामे सुरू आहेत.

जिल्हा परिषदेकडून येथील लोणंद- नीरा पालखी मार्गावर रेल्वे उड्डाणपुलानजीक वनवे पेट्रोल पंपासमोर प्रथमच वारकऱ्यांसाठी वॉटर प्रूफ जर्मन हँगर निवारा शेड उभारण्यात येत आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. १०० बाय १०० फूट लांबी रुंदीचे तसेच १८ ते ४० फूट उंचीचे भले मोठे हे निवारा शेड आहे.

तीन हजार वारकऱ्यांना एकाच छताखाली निवारा मिळणार आहे. त्यामध्ये मोबाईल चार्जिंग पॉइंट, २० टॉयलेट युनिट, बाथरूम, हिरकणी कक्ष, मेडिकल सेवा केंद्र, मसाज सेंटर, सोहळ्याची सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी दोन डिजिटल स्क्रीन, जमिनीवर मुरूम व कच टाकून सपाटीकरण करून त्यावर कार्पेट टाकण्यात येत आहे. आतमध्ये पाण्याचा थेंब येणार नाही, अशी व्यवस्था आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटण येथे गुणवंत यशस्वी विद्यार्थ्यांचा भारतीय बौद्ध महासभा तर्फे भव्य सत्कार
पुढील बातमी
महाबळेश्वरमधील हॉटेलमध्ये युवतीची आत्महत्या

संबंधित बातम्या