सातारा : शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनासाठी मुबलक विद्युत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प' योजना सुरु केली आहे. याच योजनेतून भाटमरळी येथे महावितरण कंपनीच्या माध्यमातून ६ मेगा वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे या भागातील ४५०० शेतकऱ्यांना १२ तास विद्युत पुरवठा होणार असून यामुळे शेतकऱ्यांचा विजेच्या कमतरतेचा मोठा प्रश्न मिटला आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
भाटमरळी, ता. सातारा येथे ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून, राज्य शासनाच्या ऊर्जा विभागामार्फत उभारण्यात आलेल्या ६ मेगा वॅट क्षमतेच्या मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब हरनोळ, कार्यकारी अभियंता अमित बारटक्के, सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, पंचायत समितीचे माजी उपसभापती अरविंद चव्हाण, सातारा तालुका खरेदी विक्री संघाचे व्हा. चेअरमन राजेंद्र यादव, संचालक सुरेंद्र देशपांडे, विजय पोतेकर, विनय गावडे, सयाजी चव्हाण आदी मान्यवरांसह परिसरातील सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते.
४५०० शेतकऱ्यांना याचा फायदा होणार
या प्रकल्पासाठी भाटमरळी ग्रामपंचायतीने २५ एकर जागा दिली असून या प्रकल्पामुळे भाटमरळीसह परिसरातील शिवाजीनगर, शेळकेवाडी, कुसवडे, पिलाणीवाडी, कुमठे, राकुसलेवाडी, शेरेवाडी, आसनगाव, निनाम पाडळी, मांडवे, सोनापूर, वेचले आदी गावातील ४५०० शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. या प्रकल्पामुळे सर्व शेतकऱ्यांना दिवसा १२ तास थ्री फेज कनेक्शन म्हणजेच वाढीव ४ तास योग्य दाबाने वीज पुरवठा होणार आहे. त्यामुळे रात्री शेतीला पाणी देण्याचा त्रास वाचणार आहे. या प्रकल्पामुळे भाटमरळी ग्रामपंचायतीला पुढील तीन वर्ष ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प पर्यावरणपूरक असून या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे.
महायुती सरकारकडून शेतकरी हिताचे अनेक निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकार शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेत असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना निश्चितच होत आहे. या भागातील सर्व प्रकारचे प्रश्न यापूर्वीच मार्गी लावले आहेत. अजूनही काही समस्या असतील किंवा विकासकामे करावयाची असतील तर, आगामी काळात ती पूर्ण केली जातील, असे ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.