कास जलवाहिनीच्या गळतीची नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी; दुरुस्तीसह अमृत २.० जोडणीचे काम युद्धपातळीवर करण्याचे आदेश

by Team Satara Today | published on : 28 December 2025


सातारा : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास योजनेच्या मुख्य जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या पार्श्वभूमीवर साताऱ्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी रविवारी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. शहराचा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्यासाठी त्यांनी पाणीपुरवठा विभागाला कडक सूचना दिल्या.

जलवाहिनीच्या गळतीमुळे पाणी साठवण टाक्या पूर्ण क्षमतेने भरत नसल्याने अनेक भागांत कमी दाबाने पाणी येत आहे. ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी नगराध्यक्षांनी 'स्मार्ट' पाऊल उचलले आहे. दुरुस्तीसाठी जेव्हा पाण्याचा 'शटडाउन' घेतला जाईल, त्याच काळात अमृत २.० योजनेअंतर्गत सुरू असलेले ९०० मिमी व्यासाच्या मुख्य पाईप लाईनच्या जोडणीचे  काम पूर्ण करावे, असे आदेश त्यांनी दिले. यामुळे भविष्यात पुन्हा शटडाउन घेण्याची गरज भासणार नाही आणि नागरिकांची गैरसोय टाळता येईल.

या कामाचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्षांनी तत्काळ 'पटेल-एस ए जेव्ही' या कंत्राटदार कंपनीसोबत बैठक घेण्याचेही निर्देश दिले. शटडाउनच्या काळात शहरात पर्यायी पाणी वितरणाचे चोख नियोजन करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या पाहणी दौऱ्यावेळी पाणीपुरवठा अभियंता शहाजी वाठारे, नगरसेवक राजू गोरे यांच्यासह पालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. सातारकरांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासन आता युद्धपातळीवर काम करत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
'अजिंक्यतारा'चे कामकाज इतर कारखान्यांसाठी दिशादर्शक - पंकज कुमार बन्सल; सदिच्छा भेटी दरम्यान काढले गौरवोद्गार
पुढील बातमी
९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गुणवत्तेची उंची गाठेल - प्रा. मिलिंद जोशी; साहित्य संमेलनाचे नाव अन्‌ बोधचिन्ह दर्शविणारा फुगा आकाशी झेपावला

संबंधित बातम्या