सातारा : सातारा शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिकेने मोती चौक ते पंचमुखी गणेश मंदिर परिसर हा नो हॉकर्स झोन जाहीर केला आहे. त्यामुळे तेथेच व्यवसायासाठी जागा मिळावी, या मागणीला स्पष्टपणे इन्कार करत मुख्याधिकार्यांनी येथील महात्मा फुले भाजी मंडई चा पर्याय सुचवला. त्यानुसार शहर विकास विभागाच्या कर्मचार्यांनी विक्रेता संघटनेच्या पदाधिकार्यांबरोबर या जागेची पाहणी केली.
याबाबतची माहिती घेतली असता केवळ सातारा शहरातील 70 विक्रेत्यांची बायोमेट्रिक नोंद झाली असून अद्याप 200 छोट्या विक्रेत्यांची नोंदणी बाकी आहे. त्यामुळे पुनर्वसनाची प्रक्रिया रखडून पडली आहे. विक्रेत्यांनी तात्काळ ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घेवून याबाबतची कागदपत्रे पालिकेला सादर करावीत, असे आवाहन मुख्याधिकार्यांनी विक्रेत्यांना केले आहे. मात्र विक्रेत्यांच्या दोन गटांमध्ये संबंधित जागेवरून मतभेद असल्याने पुनर्वसनाचे गाडे अडकून पडले आहे.
बुधवारी विक्रेते संघटना व काही राजकीय संघटनेच्या प्रतिनिधींनी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची भेट घेत पुन्हा हॉकर्स झोनमध्येच बसवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. त्यावेळी बापट यांनी त्या विक्रेत्यांना स्पष्ट शब्दांमध्ये मनाई केली. आपण आपली नोंदणी तात्काळ पूर्ण करून घ्या. मी तुम्हाला व्यवसायाची पडताळणी करून योग्य ती जागा देतो, असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले. मात्र तरी काही राजकीय प्रतिनिधींनी आपला विरोधाचा हेका कायम ठेवला होता.
त्यावेळी मुख्याधिकार्यांनी त्यांना स्पष्ट शब्दात खडसावले. ते म्हणाले, पुनर्वासाची प्रक्रिया ही शासकीय पद्धतीनेच होईल. त्यासाठी काही नियम आहेत. बायोमेट्रिक नोंद असणार्यांचेच पुनर्वसन होईल. त्यानंतर शहर विकास विभागाचे अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम आणि विक्रेते यांनी येथील महात्मा फुले मंडई परिसर तसेच येथील पेट्रोल पंपा जवळील परिसराची पाहणी केली. यासंदर्भात बोलताना प्रशांत निकम म्हणाले, सातारा नगरपालिकेने या विक्रेत्यांच्या पुनर्वसनाचा आराखडा बनवला आहे, त्या पद्धतीनेच काम होईल. ज्यांच्या नोंदी बाकी आहेत त्यांनी याबाबत तत्काळ पालिकेशी आवश्यक कागदपत्रांसह संपर्क साधावा. अन्य कोणत्याही विक्रेत्यांना नको त्या ठिकाणी बसू दिले जाणार नाही. नो हॉकर्स झोनमध्ये अतिक्रमण केल्यास त्यांच्यावर स्पष्ट कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे निकम यांनी सांगितले.