कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील विशेष सहाय्य योजनांअंतर्गत पेन्शन घेणाऱ्या लाभार्थ्यांनी केवायसी पूर्ण न केल्यास त्यांची पेन्शन बंद करण्यात येणार असल्याचा इशारा तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांनी दिला आहे.
तालुक्यातील एकूण ८ हजार ३०६ लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य योजनेअंतर्गत दरमहा डीबीटी प्रणालीद्वारे पेन्शन वितरित केली जाते. मात्र, यापैकी ९२२ लाभार्थ्यांनी अद्याप केवायसी आधार प्रमाणिकरण पूर्ण केलेले नाही.
शासनाकडून वारंवार मुदतवाढ देऊनही संबंधित लाभार्थ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. याबाबत तहसीलदार कार्यालयाकडून लेखी नोटिसा देऊन मुदतीत केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले होते, तरीही प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाने आता कडक भूमिका घेतली आहे. दरम्यान, लाभार्थ्यांना २१ शनिवारी व २२ मार्च 2026 रविवारी या कालावधीत आधार कार्डसह, यु डी आय डी कार्ड घेऊन तहसीलदार कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरीही अनेक लाभार्थी अनुपस्थित राहिल्याने ते सध्या लाभापासून वंचित आहेत.
ज्या लाभार्थ्यांनी अद्याप केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनी २२ मार्च अखेर तहसील कार्यालय, कोरेगाव येथील तळ मजल्यावरील संजय गांधी योजना शाखेत आधार कार्ड, बँक पासबुक आणि दिव्यांग लाभार्थ्यांनी युडीआयडी कार्डसह उपस्थित राहून प्रक्रिया पूर्ण करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. निर्धारित मुदतीपर्यंत केवायसी न करणाऱ्या तसेच आवश्यक कागदपत्रे सादर न करणाऱ्या लाभार्थ्यांची पेन्शन बंद करण्यात येणार असून त्यास संबंधित लाभार्थी स्वतः जबाबदार राहतील, असा इशारा तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांनी दिला आहे.