कराड : एआय तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील महिला डॉक्टरसह अन्य दोन डॉक्टर, एका युवक-युवतीचा अश्लील व्हिडिओ बनवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ परराज्यातून बनवून घेण्यात आल्याचा संशय व्यक्त होत असून, याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी परराज्यातून काही यंत्रणेसह या गुन्ह्यातील एकाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत माहिती अशी, एका युवतीला एका अनोळखी व्यक्तीने 20 मे रोजी व्हॉटस्ऍपवरील एका ग्रुपमध्ये समाविष्ट केले. त्या ग्रुपमध्ये अन्य 26 लोकांना समाविष्ट केले होते. त्याच मध्यरात्री संबंधित व्हॉटस्ऍप ग्रुपवर एक महिला डॉक्टर आणि संबंधित महिलेची डॉक्टरांशी ओळख नसतानाही अन्य एका डॉक्टरचे छायाचित्राचा वापर करून अश्लील व्हिडिओ तयार करून तो संबंधित ग्रुपवर पोस्ट केला..त्या कालावधीत या ग्रुपवर दुसरा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला. त्यात संबंधित तक्रारदार युवतीचा एका युवकासोबत अश्लील व्हिडिओ बनविण्यात आल्याचे दिसून आले.या धक्कादायक प्रकारानंतर संबंधित युवतीने माहिती घेत ज्या- ज्या लोकांचे अश्लील व्हिडिओ बनविले आहेत, त्या सर्वांना शोधून शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. त्यानंतर याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. यातील एकजणाला ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणाचा सूत्रधार स्वतःला डॉक्टर म्हणून घेणाराच एक संशयित असल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. परराज्यातून व्हिडिओ बनवून घेण्यासाठी त्याने पैसे दिल्याचे परराज्यातील संशयिताकडून पोलिसांना समजले आहे. संबंधिताचे काही साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. मात्र, याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात असून, संशयित डॉक्टरकडे चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
