मुंबई : पृथ्वीराज चव्हाण हे तज्ज्ञ आहेत. त्यांनी अनेक स्तरांवर काम केले आहे. त्यांची माहिती बरोबर आहे. आमच्याकडेही ती माहिती आहे. त्यामुळे आज अमित शाहांना ताप आल्याचं पुढे आले आहे. मराठी माणूस पंतप्रधान होईल की नाही यावर मी भाष्य करू शकत नाही परंतु १९ तारखेला काहीतरी स्फोट होतोय हे नक्की. त्यामुळेच भाजपाच्या सर्व खासदारांना दिल्लीत थांबायला सांगितले आहे. व्हिप निघाला आहे. धावाधाव सुरू आहे, असं खा. संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
१९ तारखेला देशाच्या राजकारणात मोठा स्फोट होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्याचा केंद्रबिंदु अमेरिकेत आहे. काही अशी माहिती समोर येत आहे ज्यामुळे भारतात मोदींना सत्तेवर राहता येणार नाही अशी चर्चा आहे. पृथ्वीराज चव्हाणांनीही हे म्हटलं आहे. त्यामुळे १९ तारखेची वाट पाहावी लागेल असं विधान खा. संजय राऊत यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण यांचं राजकीय विश्लेषण आहे. १९ डिसेंबरला अमेरिकेच्या संसदेत किंवा बाहेर काही महत्त्वाचे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. या भारतासंदर्भात काही महत्त्वाची माहिती समोर येणार आहे. खासकरून पंतप्रधान मोदी आणि भाजपाबाबत असणार आहे अशी चर्चा अमेरिकेत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू आहे. ही माहिती अत्यंत स्फोटक, धक्कादायक आणि अंधभक्तांना कायमचं कोमात पाठवणारी माहिती आहे. त्यानंतर जी फजिती भाजपा नेत्यांची होणार आहे त्यामुळे त्यांना सत्तेत राहता येणार नाही अशा प्रकारचे विश्लेषण समोर आले आहे असं त्यांनी सांगितले.
अमेरिकेतील कुख्यात उद्योगपती जेफ्री एपस्टीन याच्यावर मानवी तस्करी, अल्पवयीन मुलींचे शोषण, हनी ट्रॅप यांसारखे गंभीर गुन्हे असून, या संदर्भातील गोपनीय कागदपत्रे एका महिन्यात खुली करण्याचा निर्णय अमेरिकेच्या सिनेटने घेतला आहे. या प्रकरणाशी संबंधित गोपनीय कागदपत्रांमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, उद्योगपती बिल गेट्स, ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स अँड्र्यू यांच्यासह भारतातील दोन विद्यमान आणि एका माजी खासदाराचा समावेश असल्याचा दावा करीत, १९ डिसेंबरला ही कागदपत्रे उघड झाल्यानंतर देशात मोठी राजकीय उलथापालथ होईल,' असा पुनरुच्चार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी केला आहे. या गोपनीय कागदपत्रांमुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हतबल असण्याची शक्यता आहे असा दावाही त्यांनी केला आहे.