सातारा : सायन- पनवेल महामार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील विशेष राज्य महामार्ग आहे. यामध्ये मानखुर्द परिसरात सदर महामार्गाच्या हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बांधकाम करून नागरिक राहत आहेत. त्या जमिनीचे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) च्या मार्फत सर्वेक्षण करून त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी दिले.
मुंबई येथे विधानभवनात ना. शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात सह्याद्री मित्र मंडळ चाळ कमिटी, महात्मा फुले नगर (शिंदेवाडी), यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय महामार्ग, मानखुर्द, मुंबई येथील रहिवाशांच्या समस्यांबाबत महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीस आमदार सना मलिक शेख, सार्वजिनिक बांधकाम विभागचे सचिव (रस्ते) संजय दशपुते, अवर सचिव सुधीर शिंगाडे यांच्यासह संबंधित विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील विशेष राज्य महामार्ग मानखुर्द परिसरातून जातो. या महामार्गाच्या हद्दीत अनेक अनधिकृत झोपड्या, गाळे व बांधकामे आढळली होती. सुरक्षेच्या कारणास्तव ही अतिक्रमणे निष्काषित करण्यात आली आहेत.
गरीब आणि विस्थापित झालेल्या नागरिकांना न्याय मिळावा, या दृष्टीने या जागेचे सर्वेक्षण करुन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत पुनर्वसनाची प्रक्रिया शासनाच्या धोरणानुसार सुरू करून संबंधित नागरिकांचे योग्य पुनर्वसन करा, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.