फलटण : संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेवर कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेले बरड, ता. फलटण गावचे सुपुत्र ११५ इंजिनिअर रेजिमेंटचे जवान नायक विकास विठ्ठलराव गावडे यांना हजारोंच्या उपस्थितीत शोकाकुल वातारणात अखेरचा निरोप देण्यात आला. शासकीय इतमामात अंत्यसंस्कारावेळी बंदुकीच्या फैरी हवेत झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली.
शहीद जवान नायक विकास गावडे यांचे पार्थिव आज सकाळी सुदानहून मुंबईमध्ये एका विशेष विमानाने आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्या मूळगावी बरड (ता. फलटण) येथे लष्कराच्या सजववलेल्या गाडीतून पार्थिव आणण्यात आले. त्यानंतर लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराची प्रक्रिया प्रशासनाकडून समन्वयाने पार पाडन्यात आली. प्रशासनातर्फे आवश्यक त्या सर्व व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, विद्यमान आमदार सचिन पाटील, प्रांत प्रियंका आंबेकर, तहसीलदार डॉक्टर अभिजीत जाधव अनिकेत राजे नाईक निंबाळकर तसेच सर्व पक्षातील पदाधिकारी आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते.
देशासाठी बलिदान दिलेल्या नायक विकास विठ्ठलराव गावडे यांच्या वीरमरणामुळे गावात शोकमग्न वातावरण असून, त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र, देशसेवेसाठी दिलेल्या त्यांच्या सर्वोच्च बलिदानाचा अभिमान प्रत्येक भारतीयाच्या मनात कायम राहील, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.