साताऱ्यातील महिला पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू

by Team Satara Today | published on : 02 April 2025


कराड : कोयना बिनतारी संदेश यंत्रणा विभागात कार्यरत असणाऱ्या सत्वशीला सुहास पवार (वय ३७, रा. सातारा) या महिला पोलिस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना मलकापुरात आज घडली.

सकाळी सातच्या सुमारास त्यांना चक्कर आल्याने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. कराड  तालुक्यातील शहापूर माहेर व सातारा सासर असलेल्या सत्वशीला पवार या मागील वर्षीपासून कराड शहर पोलिस ठाण्यात कार्यरत होत्या. सद्यःस्थितीत त्या कोयना बिनतारी संदेश यंत्रणा या विभागात प्रतिनियुक्तीवर कर्तव्य बजावत होत्या.

यापूर्वी त्यांनी उपअधीक्षक कार्यालयात प्रतिनियुक्तीवर कर्तव्य बजावले होते. त्या मलकापूरमध्ये वास्तव्यास होत्या. आज सकाळी सातच्या सुमारास याच ठिकाणी त्यांना अचानक चक्कर आली. त्यानंतर त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयात जाहीर करण्यात आले. या दुर्दैवी घटनेनंतर त्यांची उत्तरीय तपासणी येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली.

त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. साताऱ्यातील संगममाहुली येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक वंदना श्रीसुंदर, सहायक पोलिस निरीक्षक श्रद्धा आमले, तब्बसुम शादीवान, सरिता जाधव यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
उरमोडी कॅनॉलमध्ये बुडून बहीण-भावाचा मृत्यू
पुढील बातमी
महाराष्ट्र वैदयकीय परिषद निवडणूक 2025 जाहीर

संबंधित बातम्या