जिल्ह्यात कार्तिकी एकादशी धार्मिक वातावरणात साजरी

by Team Satara Today | published on : 12 November 2024


सातारा : मराठी महिन्यातील आषाढी एकादशी पासून चार महिने चातुर्मास संपन्न होतो तो कार्तिकी एकादशी पर्यंत. आषाढ महिन्यातील एकादशीला देवशयनी अर्थात देवांची झोप सुरू होते म्हणून याला देवशयनी एकादशी म्हणतात तर चार महिने संपूर्ण चातुर्मास साजरा होताना कार्तिक महिन्यातील एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे म्हटले जाते. हा चातुर्मास सांगता सोहळा कार्तिकी एकादशीला मोठ्या धार्मिक वातावरणात संपन्न होतो. अनेक वैष्णव भक्त हे उपवासाचे व्रत करून एकादशीचा सोहळा  पूजा, हरिपाठ, भजन, अभंग गायन तसेच हरिनामाचा जागर करत साजरा करतात.

यावर्षी मंगळवारी संपन्न झालेल्या कार्तिकी एकादशीला सातारा शहरातील मंगळवार पेठ येथील श्री गवई विठ्ठल मंदिरातही पहाटेची काकड आरती झाल्यानंतर देवाला अतिशय सुरेख असे सोन्या-चांदीचे अलंकार घालून विविध फुलांच्या हारांनी मूर्तींना सजवण्यात आले होते. याकरिता गवळी परिवारातर्फे संतोष गवळी, शैलेश गवळी आणि गवळी परिवारातील महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. दिवसभर दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती. सायंकाळी महिला मंडळाचे भजन झाल्यावर रात्री आरती करण्यात आली, तसेच येणाऱ्या सर्व भक्तांना राजगिरा लाडू व केळाचा प्रसाद हातात वितरीत करण्यात आला.

यानिमित्त मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सातारा शहरातील यादोगोपाळ पेठेतील श्री घाटगे विठ्ठल मंदिरातही सध्या कोजागिरी पौर्णिमेपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत काकड आरती सुरू असून मंदिरात एकादशीनिमित्त विशेष पूजा करण्यात आली. सातारा शहरातील कमानी हौद परिसरातील श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिर तसेच संगम माहूली परिसरातील श्री राही, रखुमाई विठ्ठल मंदिर आणि जावली तालुक्यातील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या करहर येथे विठ्ठल मंदिरात विशेष पूजा झाल्यावर भाविकांनी रांगा लावून विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले.

सातारा शहरातील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिर परिसरातील राधाकृष्ण मंदिरात तसेच यादो गोपाळ पेठेतील दिवशीकर बंधूंच्या मुरलीधर मंदिरातही एकादशीनिमित्त विशेष पूजा तसेच फुलांचे आरास करण्यात आली होती. सातारा जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गोंदावले तसेच श्री क्षेत्र सज्जनगड येथेही आषाढी एकादशी निमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा-जावलीतील जनतेच्या आशीर्वादामुळे माझा विजय निश्चित : आ. शिवेंद्रराजे
पुढील बातमी
'ही' अभिनेत्री आता 'वीर मुरारबाजी' मध्ये पुन्हा सोयराबाई म्हणून दिसणार

संबंधित बातम्या