जावळी : जावळी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा, या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या मोर्चाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजन केले होते. आमदार शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती कार्यालय ते बाजार चौक, वेण्णा चौक, तहसील कार्यालय मार्गावर मोर्चा काढण्यात आला, तसेच जावळीचे तहसीलदार हणमंत कोळेकर यांना विविध मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.
ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा खुर्च्या खाली करा अशा घोषणा देत मोर्चा काढण्यात आला. या वेळी पक्षाचे विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सुरेश पार्टे, माथाडीचे नेते विठ्ठलराव गोळे, माजी सभापती मोहनराव शिंदे, बाजार समितीचे संचालक बुवासाहेब पिसाळ, राज्य महिला आघाडीच्या राज्याध्यक्ष समिंद्रा जाधव, नारायण शिंगटे, रूपाली भिसे आदी उपस्थित होते. शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असाही इशारा देण्यात आला.
मोर्चासाठी आनंदराव जुनघरे, गोपाळराव बेलोशे, रामदास पार्टे, राजश्री शिंदे, सोमनाथ कदम, रोहित रोकडे, नारायण शिंगटे, प्रकाश कदम, विलास दुंदळे, राम कदम, चंद्रकांत गवळी, समीर डांगे, सुनील फरांदे, राजेंद्र कदम, अमृतलाल शेडगे, नारायण दळवी, तेजस्विनी केसकर, शैलजा कदम यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.
निवेदनात म्हटले, की जावळी हा अल्प भूधारक शेतकऱ्यांचा तालुका आहे. शेतकऱ्यांचा शेती करून उदरनिर्वाह चालतो. परंतु १६ मे २०२५ पासून सुरू झालेला पाऊस आजअखेर पाऊस सुरूच आहे. परिणामी तालुक्यातील ८० टक्के शेतकऱ्यांना सोयाबीन, भुईमूग, घेवडा, ज्वारी आदी पिकांची पेरणी करण्याची संधीच मिळालेली नाही. ज्या २० टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केली त्यांची सततच्या पडणाऱ्या पावसामुळे पिकांची पूर्णपणे नासाडी झाली आहे. त्यामुळे या वर्षीच्या हंगामी पिकांची पेरणी होऊच शकणार नाही. म्हणूनच तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
महसूल मंडल अधिकाऱ्यांनी सतत पडणाऱ्या पावसाची दखल घेऊन प्रत्येक गावामधील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करणे अत्यावश्यक होते. जेणेकरून सरकार दरबारी तालुक्यामध्ये सतत पडणाऱ्या पावसाची नोंद घेऊन ओला दुष्काळ जाहीर करण्यास मदत झाली असती; परंतु आजअखेर कोणतीही यंत्रणा शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर आलेली नाही. तालुक्यात मागील दीड महिन्यापासून सतत पडणाऱ्या पावसाची नोंद घेऊन केंद्र व राज्य शासनाच्या नैसगिक आपत्ती निवारण योजनेतून ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तालुक्यात मागील दीड महिन्यापासून सतत पडणाऱ्या पावसाची नोंद घेऊन केंद्र व राज्य शासनाच्या नैसगिक आपत्ती निवारण योजनेतून ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.