कातरखटाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या शताब्दी वर्षानिमित्त रविवारी (ता. १२) वडूज शहरातून स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध संचलन झाले. वडूज शहरातील हुतात्मा हायस्कूल, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मुख्य रस्त्यावर स्वयंसेवकांनी घोषाच्या तालावर शिस्तबद्ध पद्धतीने पथसंचलनाद्वारे देशभक्तीचा उत्सव साजरा केला.
संघ स्थापनेच्या शताब्दी वर्षाच्या पंचसूत्री कार्यक्रमांची सुरुवात हुतात्मा हायस्कूल येथून संचलनाने झाली. यावेळी शेकडो स्वयंसेवकांनी संचलनात सहभाग घेतला. संचलन मार्गावर ग्रामविकास व पंचायतराजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण केले.
शताब्दी वर्षानिमित्त संचलनाद्वारे सामाजिक बांधिलकी व मूल्यांचा प्रसार देशातील शेवटच्या घटकापर्यंत करण्यास सुरुवात झाली आहे. यातून सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्वबोध आणि नागरी शिष्टाचार या पंचसूत्रीबाबत आगामी काळात कर्तव्य करण्याचा संदेश देण्यात आला. संचलनानंतर उत्सव व शस्त्रपूजन झाले.
कऱ्हाड येथील रूपेश कुंभार यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. सेवागिरी संस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तालुका कार्यवाह धनंजय चिंचकर यांनी मनोगत व्यक्त केले.