मतदार याद्यांमधील दुबार नावाबाबत कार्यवाहीच्या सूचना; उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण

by Team Satara Today | published on : 03 November 2025


सातारा :  राज्य निवडणूक आयोगाच्याकडून दि. २९ऑक्टोबर २०२५ रोजीच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वापरण्यात येणा-या मतदार याद्यांमध्ये दुबार नावे (एकाच मतदाराचे नाव दोन किंवा अधिक वेळा नोंद झालेले) आढळल्यास त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

भारतीय संविधानातील कलम २४३ के व २४३ झेडए तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियमानुसार राज्य निवडणूक आयोगास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी मतदार याद्या तयार करण्याचे व नियंत्रण ठेवण्याचे अधिकार आहेत. तथापि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीकरिता राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या दिनांकास अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार या है संबंधित जिल्हा परिषद निवडणूक विभाग/पंचायत समिती निर्वाचक गणात विभागून वापरण्यात येते. मात्र असे करीत असताना सदर मतदार यादीमध्ये मूळ विधानसभा मतदार यादीत नसलेली कोणतीही नवीन नावे समाविष्ट करणे, अथवा मूळ विधानसभा मतदार यादीमध्ये समाविष्ट असलेली नावे वगळणे अथवा त्यामध्ये दुरुस्त्या करण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगास किंवा राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांची मतदार यादी तयार करण्याकरिता प्राधिकृत केलेल्या अधिका-यास नाहीत.

सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक विभागातील अंतिम मतदार यादीतील दुबार मतदारांसंदर्भात महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित विभागांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे ॲक्सेस केल्यानंतर रिपोर्ट या मुख्य टॅबखालो "दुबार रिपोर्ट" असा सबमेन्यू देण्यात आलेला आहे. या सबमेन्यूवर क्लिक केल्यावर आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार यादीमध्ये किती मतदारांची नावे एकापेक्षा अधिक वेळा आलेली आहेत, त्यांची यादी सविस्तर तपशिलासह दिसून येते. या मतदार यादीमध्ये संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर (**) असे चिन्ह दिलेले आहे. या यादीतील संभाव्य दुबार मतदारांबाबत स्थानिकरित्या तपासणी करून तो खरोखरच एकाच व्यक्तीची आहे किंवा वेगळ्या व्यक्तींची आहे, याबाबत खात्री करणे आवश्यक आहे. यासाठी मतदाराचे नाव, लिंग, पत्ता व छायाचित्र याची प्राथमिक तपासणी करून त्यांत साम्य आढळून आल्यास संबंधित मतदाराशी संपर्क साधून त्याच्याकडून आवश्यक माहिती मिळवावी.

त्यानुसार एकापेक्षा जास्त नाव असलेला मतदार हा प्रत्यक्षात एकच व्यक्ती आहे, याची खात्री झाल्यानंतर त्या मतदाराकडून तो नेमका कोणत्या प्रभागातील, जिल्हा परिषद निवडणूक विभागातील/पंचायत समितीच्या गणातील मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबतचा अर्ज (परिशिष्ट एक) सोबत जोडलेल्या नमुन्यात घेण्यात यावा. त्यानुसार प्राधिकृत अधिकान्याची खात्री पटल्यानंतर संबंधित मतदारास त्याच्या इच्छेप्रमाणे मतदान करण्यासाठी जिल्हा परिषद निवडणूक विभाग/पंचायत समिती गण यांतील मतदान केंद्र निश्चित करावे. संबंधित मतदारांस त्याने निवडलेल्या जिल्हा परिषद निवडणूक विभागातील/पंचायत समिती गणातील मतदान केंद्रातच मतदान करण्याचा अधिकार असेल व इतर जिल्हा परिषद निवडणूक विभाग/ पंचायत समिती गणात देखील नाव असलेल्या अशा मतदाराच्या नावासमोर "दुबार मतदार, जिल्हा परिषद निवडणूक विभाग पंचायत समिती गण क्रमांक... मतदार क्रमांकविभागात,  पंचायत समिती गणात मतदान करणार आहे त्याचा क्रमांक व मतदाराचा अनुक्रमांक नमूद करेल, अशी नोंद झालेल्या मतदारास उर्वरित कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही.

जर एकापेक्षा अधिक नावे असलेल्या मतदाराकडून प्रतिसाद न मिळाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार यादीमध्ये अशा मतदाराच्या नावासमोर दुबार मतदार अशी नोंद घेण्यात यावी, अशी नोंद असलेला मतदार मतदान केंद्रावर मतदान करण्यास आल्यास त्या मतदाराकडून त्याचे नाव असलेल्या इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत सोबतच्या नमुन्यातील हमीपत्र (परिशिष्ट दोन) लिहून घेण्यात यावे व अशा मतदाराची काटेकोरपणे ओळख पटवून त्यास मतदान करू देण्याची मुभा द्यावी. अशा पध्दतीने प्राप्त झालेली हमीपत्रे चिन्हांकित मतदार यादीसाठी असलेल्या लिफाफ्यामध्ये ठेवण्यात यावीत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
किल्ले प्रतापगड येथील सुविधांसाठी आवश्यकता भासल्यास देवस्थानची जमीन देवू -खासदार उदयनराजे भोसले
पुढील बातमी
वरकुटेमध्ये होणार मोफत सामुदायिक विवाह सोहळा; फुलाबाई नरळे ट्रस्ट व साईसागर फाऊंडेशनचा उपक्रम

संबंधित बातम्या