सातारा : महाबळेश्वर येथील बॉबिंग्टन पॉईंट ते टायगर पाथ या राईडवर वनक्षेत्रात दुर्गंधीयुक्त सांडपणी सोडून वनातील वन्यप्राण्यांचा अधिवास नष्ट केल्याच्या प्रकारावरुन फाउंटन हॉटेलचे व्यवस्थापक आबिद मोहम्मद डांगे यांच्यावर भारतीय वन अधिनियमांतर्गंत वनगुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, वनक्षेत्रात सांडपाणी, मैलापाणी सोडण्यावर वनकायद्याने बंदी आहे. अशाप्रकारे कृत्य करून वनकायद्याचे उल्लंघन केल्यास 1 वर्ष मुदतीपर्यंतचा कारावास किंवा पाच हजार रुपयापर्यंतचा द्रव्यदंड किंवा या दोन्ही होऊ शकतात. तरीही बॉबिंग्टन पॉईंट ते टायगर पाथ या राईडवर 200 मी. पर्यंत वनक्षेत्रात सांडपाणी वाहत असल्याचे दिसून आले. वनविभागाच्या पाहणीनंतर व्यवस्थापक डांगे यांनी गुन्हा झाल्याचे कबूल केले आहे. त्यानंतर हा वनगुन्हा दाखल झाला आहे. महाबळेश्वर परिसरातील हॉटेल, रिसोर्ट व इतर व्यावसायिक यांना सूचित करण्यात येते की, वरीलप्रमाणे कोणताही वनगुन्हा करण्यात येऊ नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा वनविभागाने दिला आहे. तसेच अशी घटना कोणाच्या निदर्शनास आल्यास त्याबाबतची माहिती वनविभागास कळवून वनविभागाला सहकार्य करावे. माहिती देणार्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.
ही कारवाई सातारा उपवनसंरक्षक अमोल सातपुत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप रौंधळ, महाबळेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव मोहिते, वनपाल सुनील लांडगे, वनरक्षकलहू राऊत, महाबळेश्वर वनपरिक्षेत्र येथील वनमजूर यांनी केली. पुढील तपास वनपाल सुनील लांडगे करत आहेत.