सातारा : सातारा शहरात बनावट पोलिसांच्या वेशात महिलांना लुटण्याच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कमानी हौद येथून घरी जात असताना अज्ञात दोन इसमांनी पोलीस असल्याची बतावणी करून ६६ वर्षीय महिलेला लुटल्याची धक्कादायक घटना दि. १० रोजी दुपारी सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार पेठ परिसरातील रहिवासी असलेल्या मंगल सदानंद वंजारी (वय ६६) या कमानी हौद येथून परतत असताना राजेश्वर मंदिरासमोर दोन अनोळखी इसमांनी त्यांना अडवले. स्वतःला पोलीस असल्याचे सांगत संशयास्पद हालचालींचा बहाणा करत त्यांनी वंजारी यांच्याकडील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेत पळ काढला.आपल्याला लुटले गेले असल्याचे लक्षात येताच वृद्धेने आरडाओरडा केला मात्र तोपर्यंत चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले.
शहरात मागील काही दिवसांपासून अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडत असून महिलांमध्ये तसेच नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारीपासून बनावट पोलिसांच्या नावाखाली सुरू असलेल्या लुटमारीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या घटनेचा पोलीस तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजसह विविध तपासांच्या दिशा तपासल्या जात आहेत.