यवतेश्वरच्या घाटातून धावले साडेआठ हजार स्पर्धक

जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये यंदाची स्पर्धा; सातारा हाफ हिल मॅरेथॉनला देशभरातून प्रतिसाद

by Team Satara Today | published on : 14 September 2025


सातारा, दि. १४ : दमसास आणि शारीरिक तंदुरुस्ती या दोन गोष्टींना वाहिलेल्या सातारा हाफ हिल मॅरेथॉनने पुन्हा एकदा रविवारी आपल्या कीर्तीचा डंका वाजवला. चौदाव्या वर्षात पोहोचलेल्या सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धेत सातारा जिल्ह्यासह देशभरातून आलेल्या साडेआठ हजार स्पर्धकांनी आरोग्यपूर्ण धाव घेतली. यवतेश्वरच्या घाटातून टप्प्याटप्प्याने पुढे सरकणारे स्पर्धक हे मनोहरी दृश्य निसर्गाच्या पार्श्वभूमीवर अधिक उठावदार ठरले. टप्प्याटप्प्यावर चीअरअप करणारे सातारकर आणि मॅरेथॉन पूर्ण करण्यासाठी होणारी स्पर्धकांची धाव अशा जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये यंदाची मॅरेथॉन स्पर्धा पार पडली.

येथील पोलीस कवायत मैदानावर सकाळी साडेसहा वाजता जिल्हाधिकारी संतोष पाटील व पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी फ्लाग ऑफ करून मॅरेथॉनला सुरुवात केली. यावेळी सातारा रनर्स फाउंडेशनचे सर्व संयोजक उपस्थित होते. सकाळच्या कुंद वातावरणामध्ये टी-शर्ट रेसिंग ट्रॅक शूज अशा परफेक्ट मॅरेथॉन किटमध्ये प्रत्येक स्पर्धक हजारोच्या संख्येने दिसून आले. हलक्याशा वॉर्मअपनंतर फ्लाग ऑफ होऊन स्पर्धकांनी पोलीस कवायत मैदान पोवई नाका, शाहू चौक, केसरकर पेठ, आदालत वाडामार्गे समर्थ मंदिर चौक तेथून बोगदा व यवतेश्वरच्या सहा किलोमीटरच्या घाट टप्प्यातून पुढे प्रकृती हेल्थ रिसॉर्टच्या पुढे पाचशे मीटर जाऊन पुन्हा माघारी परतण्याचा ठरवण्यात आला होता. हजारो स्पर्धकांनी या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये शारीरिक तंदुरुस्तीची जोरदार धाव घेतली. या स्पर्धेला सातारकरांनी जोरदार प्रतिसाद दिला.

जल्लोषपूर्ण वातावरण : स्पर्धकांच्या सोयीसाठी प्रत्येक एक किलोमीटरच्या टप्प्यावर संयोजकांनी तात्पुरते सपोर्ट सेंटर उभे केले होते तसेच सातारकर आणि आबालवृद्ध मॅरेथॉनच्या स्पर्धकांना उत्तेजन देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. यवतेश्वर घाटामध्ये हजारो स्पर्धकांचा जथा टप्प्याटप्प्याने पुढे सरकत होता. पोलिसांनी तैनात केलेल्या काही ड्रोन कॅमेऱ्याने ही मनोहरी दृश्य टिपली. महिला पुरुष सर्व स्पर्धकांनी या मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेऊन सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धा देशभरात काय वेगळी आहे याचाच जणू परिचय दिला.

तोच उत्साह आणि संयोजकांची अखंड पळापळ : या स्पर्धेची नोंद घाटाचा नैसर्गिक चढ तसेच येथील वातावरण आणि खेळाडूंचा मिळणारा प्रतिसाद यामुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. संयोजकांनी बुकिंग ओपन केल्यानंतर दोनच दिवसांमध्ये साडेआठ हजार स्पर्धकांचा या मॅरेथॉनला प्रतिसाद मिळाला. तोच उत्साह आणि संयोजकांची अखंड पळापळ यानिमित्ताने पाहायला मिळाली.

स्पर्धकांकडून संयोजकांचे कौतुक : 21 किलोमीटरचा रेसिंग ट्रॅक हा पोलीस बंदोबस्तामध्ये पूर्णतः रिकामा ठेवण्यात आला होता. त्यामुळे सकाळच्या सत्रातील कास पठाराचा फुलांचा हंगाम बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर पठारावर फुलांचे सौंदर्य अनुभवण्यासाठी चार ते पाच किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे अनुभवायला मिळाले. स्पर्धकांनी साताऱ्यात आल्याचा एक वेगळा अनुभव असल्याचे मत नोंदवत संयोजकांचे कौतुक केले. मॅरेथॉन स्पर्धेची शारीरिक तंदुरुस्तीनंतर त्यांनीही कास पठारावरील फुलांचा आनंद घेतला.

सातारा हिल मॅरेथॉनचे जगभरात नाव : जिल्हाधिकारी संतोष पाटील

सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धा 2012 मध्ये सुरू झाली. तेव्हापासून या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. एखाद्या जागतिक स्पर्धेच्या आयोजापमाणे ही सर स्पर्धा साताऱ्यात पार पडत आहे जगभरातील क्रीडा जगतामध्ये या स्पर्धेचे नाव झाले आहे असे गौरव उद्गार जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सातारा मॅरेथॉन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी काढले. जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, यावर्षी साडेआठ हजार पेक्षा जास्त स्पर्धकांनी या मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या स्पर्धेला वाढता प्रतिसाद आहे. जगभरातील क्रीडा जगतात या स्पर्धेचे नाव झाले आहे. सातारा रनर्स असोसिएशनचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मराठा हेच कुणबी असल्याचा पुरावा संत तुकोबारायांच्या अभंगामध्येच
पुढील बातमी
सातारा हाफ हिल मॅरेथॉनवर सांगलीच्याअंकुश लक्ष्मण हाकेची मोहोर

संबंधित बातम्या