सेवागिरी यात्रेनिमित्त पुसेगाव येथे कुस्त्यांचा महासंग्राम

बुधवारी रंगणार श्री सेवागिरी कुस्ती आखाडा

by Team Satara Today | published on : 15 December 2025


पुसेगाव   :  श्री सेवागिरी महाराजांच्या 78 व्या संजीवन सोहळ्यानिमित्त तसेच श्री नारायणगिरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त तीर्थक्षेत्र पुसेगाव येथे कुस्तीप्रेमींसाठी पर्वणी ठरणारा भव्य, जंगी व निकाली कुस्ती आखाडा बुधवार, दि. 17 डिसेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कुस्ती महोत्सवात महाराष्ट्रासह हरियाणा, पंजाब व दिल्ली येथील नामवंत, आंतरराष्ट्रीय दर्जाचे पैलवान सहभागी होणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष पुसेगावकडे लागले आहे.

या कुस्ती आखाड्याचे आयोजन श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले असून पुसेगावचा आखाडा हा निकाली, तुल्यबळ व वजनावरच्या कुस्त्यांसाठी प्रसिद्ध असल्याने येथे प्रत्येक कुस्ती चुरशीची ठरण्याची परंपरा आहे. या महोत्सवातील मुख्य आकर्षण ठरणाऱ्या सेवागिरी केसरी किताबासाठी महाराष्ट्र केसरी पै. हर्षवर्धन सदगीर पुणे यांचा सामना हिंदकेसरी व भारत केसरी पै. दिनेश गुलिया (हरियाणा) यांच्याशी होणार आहे. दोन्ही पैलवानांची ताकद, अनुभव व आक्रमक खेळ पाहता ही लढत अत्यंत थरारक व निकाली होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

द्वितीय क्रमांकासाठी महाराष्ट्र केसरी पै. दादा शेळके विरुद्ध पंजाबचा बलाढ्य पै. शानवीर कोहली यांच्यात लढत होणार असून या सामन्यात ताकद, तंत्र व संयमाचा कस लागणार आहे.तसेच तृतीय क्रमांकासाठी आंतरराष्ट्रीय पदक विजेते पै. रविराज चव्हाण (पुणे) विरुद्ध इंटरनॅशनल मेडलिस्ट पै. जॉन्टी गुज्जर (दिल्ली) यांच्यातील लढत कुस्ती शौकिनांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. ही लढत अत्यंत प्रेक्षणीय ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

या आखाड्यात पै. शुभम सिद्धनाळे – संदीप मोटे, पै. गणेश कुंकुले – सुहास घोडगे, पै. कालीचरण सोलनकर – लकी कोहली, पै. समीर शेख – सतपाल सोनटक्के, पै. प्रशांत जगताप – प्रशांत शिंदे, पै. धीरज पवार – धनाजी कोळी, पै. प्रतीक देशमुख – पृथ्वीराज पाटील, पै. रोहन पवार – शाहरुख खान, पै. आकाश माने – विकी करे, पै. अतीश तोडकर – सतीश मलिक, पै. नाथा पवार – अविनाश गावडे, पै. महेश कुंभार – प्रणित कुमार, पै. आदिनाथ पाटील – सुमित गुजर, पै. गणेश कोकरे – अविनाश शिंदे, पै. मंगेश माने – अर्जुन काळे, पै. गौरव हजारे – अभिषेक भोईर, पै. भैय्या धुमाळ – अनिल कचरे, पै. संजय तनपुरे – निखिल कदम, पै. सौरभ पाटील – नामदेव कोकाटे, पै. विश्वचरण सोनलकर – शुभम दुधाळ, पै. विजय पाटील – अमोल वालगुडे, पै. जोतिबा आटकळे – भरत पाटील, पै. तुषार देशमुख – विनय चन्ने, पै. अक्षय चव्हाण – धीरज पाटील, पै. सनी मदने – प्रमोद सूळ, पै. अजय कापडे – मनीष बंडगर, पै. अशपाक तांबोळी – तेजस गोफणे, पै. देवानंद पवार – शुभम चव्हाण यांच्यासह अनेक पैलवानांच्या निकाली कुस्त्या रंगणार आहेत.

वारणेच्या कुस्ती आखाड्याच्या धर्तीवर पुसेगाव येथे लाल मातीचा गोलाकार आखाडा उभारण्यात आला असून कुस्तीप्रेमींना स्पष्ट दर्शन होण्यासाठी आधुनिक पद्धतीची आखाडा रचना करण्यात आली आहे. उत्कृष्ट निवेदक, पारंपरिक हलगी वादक, भव्य एलईडी स्क्रीन, विजेची उत्तम सोय व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण कुस्ती महोत्सवाचे युट्युबवर थेट प्रक्षेपण देखील होणार आहे.कुस्ती मैदान दुपारी १ वाजता सुरू होईल.₹100 ते ₹1000 बक्षीस गटातील कुस्त्यांसाठी पैलवानांनी सकाळी ९ ते ११ या वेळेत कुस्ती आखाडा येथे नावनोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यानंतर येणाऱ्या पैलवानांचा विचार केला जाणार नाही. पंचांचा निर्णय अंतिम राहील, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेली कुस्ती ही केवळ खेळ नसून ती एक संस्कृती, परंपरा आणि जीवनशैली आहे. या परंपरेचे जतन व संवर्धन करण्याचे कार्य श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे, अशी भूमिका ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. या कुस्ती आखाड्याच्या  यशस्वी आयोजनासाठी श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष वाघ, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, सचिन देशमुख, गौरव जाधव यांच्यासह कुस्ती कमिटीचे सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ड्रग्ज माफियांचा साताऱ्यात शिरकाव
पुढील बातमी
९९ व्या साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचे मंगळवारी लोकार्पण; साहित्य संमेलनाच्या कार्यालयात आयोजन

संबंधित बातम्या