सातारा : रामनगर, ता. सातारा परिसरातील अरविंद गवळी कॉलेजसमोर शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान दोन दुचाकींची समोरासमोर अपघात झाला. या अपघातातील धडकेचा आवाज इतका भीषण होता की, परिसरातील नागरिक धावत घटनास्थळी पोहोचले. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताचे कारण समजू शकले नाही. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत याबाबतची नोंद करण्याची प्रक्रिया सातारा तालुका पोलीस ठाण्यात सुरु होती.
या अपघाताची माहिती मिळताच सातारा तालुका पोलीस स्टेशनचे ट्रॅफिक अंमलदार पो. कॉ. उमेश बगाडे आणि पो. हवालदार सचिन घोरपडे यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून तेथील वाहतूक नियंत्रणात आणली. दरम्यान, दोन्ही जखमींना पोलिसांनी स्वत: जिल्हा रुग्णालयात हलविले. यामध्ये भानुदास पवार, (रा. सातारा), गणेश चव्हाण, (रा.आयटीआय सातारा) हे दोघेही गंभीर जखमी असून वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या अपघातात आर वन फाईव्ह यामा आणि इलेकट्रीक स्कूटी गाडी होती. दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.
दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक कशी झाली? याबाबतचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. याबाबत सातारा तालुका पोलीस अधिक तपास करत आहेत.