सातारा : सातारा जिल्हा हा शरद पवारांच्या विचारांचा जिल्हा आहे. सध्या पक्षाला उर्जित अवस्था देण्याची गरज आहे. संपूर्ण जिल्हा राष्ट्रवादीमय करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर व पक्षाचे नाव लढणार असल्याची माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
येथील राष्ट्रवादी भवनात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बाळासाहेब पाटील यांनी बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रदेश सरचिटणीस नरेश देसाई, सरचिटणीस राजकुमार पाटील, शफिक शेख, संगीता साळुंखे, अर्चना देशमुख इत्यादी यावेळी उपस्थित होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तसेच क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन केल्यानंतर बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले, राष्ट्रवादी पक्षाने माझ्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. भविष्यात जिल्ह्यात पक्ष संघटन कसे वाढवायचे या दृष्टीने आजच्या बैठकीत आम्ही चर्चा केली. लवकरच आम्ही तालुका निहाय मेळावे घेणार आहोत .हा जिल्हा यशवंत विचारांचा जिल्हा आहे. शरद पवार यांचे विचार लोकांच्या मनामध्ये रुजलेले आहेत. त्यामुळे त्याला ताकद देण्यासाठी आगामी काळामध्ये आमचा प्रयत्न राहणार आहे.
खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
येत्या 12 डिसेंबर रोजी खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत पक्षातील सर्वांना एकत्र घेऊन पवार साहेबांचा विचार घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा आहे मध्यंतरीच्या कालखंडात काही घडामोडी घडल्या परंतु भविष्यात खात्री आहे जिल्ह्यातील जनता पवार साहेबांवर प्रेम करणारी असल्यामुळे पक्षाला पुन्हा गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. राष्ट्रवादी पक्ष हा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी तुतारी चिन्हावर आणि स्वबळावर सामोरे जाणार आहे. जे समविचारी आमच्याबरोबर येथील ती राजकीय समीकरणे जुळवण्याचा आमचा प्रयत्न राहील असे ते म्हणाले.