पाचगणीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन

by Team Satara Today | published on : 01 October 2025


पाचगणी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी पर्वानिमित्त पाचगणी शहरात शस्त्र पूजन सोहळा आणि संचलन करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या संचलनात महाबळेश्वर तालुक्यातील सर्व शाखांतील शेकडो स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला. स्वयंसेवकांची पारंपरिक वेशभूषा, हातातील दंड, बॅनर, घोषणाबाजी आणि संघगीतामुळे शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.

शस्त्र पूजनाच्या कार्यक्रमात शस्त्रांच्या पूजनामागील सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या संचलनादरम्यान पाचगणी शहरातील नागरिकांनी स्वयंसेवकांचे ठिकठिकाणी स्वागत केले. अनेक ठिकाणी फुलांचा वर्षाव करण्यात आला. विशेष म्हणजे जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

कार्यक्रमाला डॉ. भावेश भाटिया व स्वप्नील परदेशी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर प्रमुख वक्ते म्हणून अशितोष (संदीप) आठले यांनी मार्गदर्शन केले. तालुका कार्यवाह विजय पवार यांनी प्रास्ताविक केले.

डॉ. सुधीर बोधे म्हणाले, ‘‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांचे कार्य, स्वयंसेवकांची समाजासाठीची निःस्वार्थ सेवा व मदतीची परंपरा जनतेपर्यंत पोहोचावी हा प्रमुख उद्देश आहे. आज संघाचे कार्य केवळ भारतापुरते मर्यादित नसून जगभरातील ४६ हून अधिक देशांमध्ये सुरू आहे. मात्र, या कार्याची माहिती सर्वसामान्य जनतेला फार कमी आहे. त्यामुळे अशा संचलनाच्या माध्यमातून संघाची कार्यपद्धती व सामाजिक योगदान समाजासमोर आणले जाते.’’



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विजयादशमी दिवशी ध्वनीक्षेपक/ध्वनीवर्धक वापरण्यास सुट
पुढील बातमी
कृषि समुद्धी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

संबंधित बातम्या